नागपूर : २८ जुलै – एका घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रात्री एक आकृती दिसली आणि ते ‘भूत’च आहे, म्हणून चर्चा सुरू झाली. आता तो संपूर्ण परिसरच भुताच्या या काल्पनिक वावराने भयभीत झाला आहे. दरम्यान, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने घटनास्थळी भेट देऊन ‘यात तथ्य नाही. भूत वगैरे साऱ्या मनाच्या कल्पना आहेत’, असे सांगून लोकांचे उद्बोधन करण्याचा प्रयत्न केला.
अजनी पोलिस स्टेशनच्या हद्दीत शताब्दी चौकाजवळ चाफलेनगर आहे. येथे मेश्राम यांच्या घरी सीसीटीव्ही लावले आहेत. १९ जुलै रोजी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास मेश्राम यांच्या नवव्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला सीसीटीव्हीच्या स्क्रीनमध्ये एक आकृती दिसली. घरासमोरील रस्त्याने ही आकृती जाताना आणि अचानक गायब होताना दिसल्याने तो मुलगा घाबरला. त्याचवेळी मुलीच्या रडण्याचा आवाज आला, असे त्या मुलाचे म्हणणे आहे. मात्र, हा आवाज घरातील इतर कुणाला आला नाही फक्त मुलालाच आला, असे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महासचिव हरीष देशमुख यांनी सांगितले.
ज्या रात्री ही आकृती दिसली त्याच्या दुसऱ्याच दिवशी मेश्राम यांनी वस्तीतील इतरांना सीसीटीव्हीतील ही इमेज दाखविली आणि परिसरात भुताची चर्चा सुरू झाली. काही वर्षांपूर्वी जवळच्याच एका विहिरीत एका मुलीने आत्महत्या केली होती. त्या आत्महत्येचा संबंध या तथाकथित भुताशी जोडला जाऊ लागला, त्या मुलीचेच हे भूत असल्याचे लोक म्हणू लागले. भुताची गोष्ट असल्याने ती इतक्या वेगात पसरली की परिसरात घरोघरी, पानटरीवर ही एकच चर्चा सुरू झाली. काहींनी पोलिस स्टेशनला फोन करून याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे १९ जुलैनंतर पुन्हा अशी आकृतीही दिसली नाही आणि कोणता आवाजही आला नाही. पण ती आकृती कशाची यावरून चर्चा रंगू लागल्या. काहीजण रात्री जागू लागले तर काही रात्री बाहेर निघणे टाळू लागले.
अंनिसला याबाबत कळताच हरीष देशमुख, नीलेश पाटील, दिलीप पाटील, मानसिक रोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सारडा यांचे पथक घटनास्थळी गेले. तेथे सर्व प्रकार ऐकून घेतला. त्यानंतर हा भुताचा प्रकार कल्पनाविलास असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. सीसीटीव्हीत दिसणारी आकृती व तरुणीची आत्महत्या या दोन गोष्टींचा काहीही संबध नाही, असेही देशमुख यांनी तेथे जमलेल्या लोकांना समजावून सांगितले. जो भूत दाखवेल त्याला २५ लाख रुपयांचे बक्षीस समितीतर्फे जाहीर करण्यात आले आहे, याचीही माहिती यावेळी देण्यात आली. जी आकृती दिसते ती एखाद्या मोठ्या पक्षाची असू शकते, असे देशमुख यांनी सांगितले. अंनिसच्या पथकाने अजनीचे ठाणेदार विनोद चौधरी यांचीही भेट घेतली. या प्रकाराबाबत कुणाची लेखी तक्रार नाही, मात्र तेथून फोन येत आहेत. अंधश्रद्धा पसरविणाऱ्यांवर जादुटोणा विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ठाणेदार चौधरी यांनी समितीला सांगितले.