मुंबई : २८ जुलै – कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्र पावसामुळे अनेक ठिकाणी विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. महापूर, भूस्खलनामुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले. राज्याती स्वयंसेवी संस्थासह अनेक नागरिकांनी आपापल्या परीने आपत्तीग्रस्तांपर्यंत मदत पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहे. अशातच राज्यातील भारतीय जनता पक्षातर्फे एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. भाजपाचे सर्व आमदार आता पूरग्रस्तांना मदत करणार आहेत.
राज्यात निर्माण झालेली पुर परिस्थिती आणि सामान्य नागरिक, व्यापारी, शेतकरी, श्रमिकांचे झालेले नुकसान पाहता भाजपाच्या आमदारांचा एक महिन्यांचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी दिली आहे. “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासोबत पक्षाच्या झालेल्या बैठकीत भाजपाच्या दोन्ही सभागृहातील आमदारांचा एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा आम्ही निर्णय आम्ही केला आहे,” असे आमदार अँड आशिष शेलार यांनी म्हटले आहे.
त्यानुसार भाजपाच्या विधानसभा आणि विधान परिषदेतील सर्व सदस्यांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करुन घ्यावे व पुरग्रस्तांसाठी जास्तीत जास्त मदत शासनाने करावी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे.
दरम्यान, राज्यातील पूरपरिस्थितीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आढावा घेतला होता. महाराष्ट्राला अशा संकटांचा अनुभव आहे सांगताना शरद पवार यांनी पूरस्थितीचा अहवाल आल्यानंतर राज्य सरकार अंतिम धोरण जाहीर करणार अशी माहिती दिली होती. दरम्यान एकूण १६ हजार कुटुंबांना पुराचा फटका बसला आहे अशी माहिती देताना राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या माध्यमातून त्यांना जीवनाश्यक वस्तूंचं वाटप केलं जाणार असल्याची माहिती शरद पवारांनी दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शरद पवारांनी यावेळी नेत्यांनी पूरग्रस्त भागाचे दौरै टाळावेत असं आवाहनही केलं.