सातारा : २८ जुलै – कोकणातील पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर राज्य विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे आज साताऱ्यात पोहोचले. साताऱ्यातील आंबेघर व मोरगिरी या पूरग्रस्त गावांतील गावकऱ्यांची त्यांनी भेट घेतली व त्यांना धीर दिला. यावेळी दोन्ही नेत्यांनी पूरग्रस्तांसोबतच जेवणही केलं.
फडणवीस व दरेकर हे आजपासून पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून पूरग्रस्त जिल्ह्यांतील गावांना भेटी देणार आहेत. साताऱ्यात आज त्यांनी आंबेघर व मोरगिरी येथील पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. साताऱ्यातील आंबेघर इथं दरड कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. या संकटानंतर संपूर्ण गावावर स्मशानकळा पसरली आहे. मोरगिरी गावची परिस्थितीही वेगळी नाही. आंबेघरमधील दुर्घटनेनंतर तेथील गावकऱ्यांच्या निवाऱ्याची सोय एका शाळेत करण्यात आली आहे. तिथं राज्य सरकारकडून त्यांना सर्व प्रकारची मदत दिली जात आहे.
फडणवीस व दरेकर यांनी आज पूरग्रस्तांशी चर्चा केली. पूरग्रस्तांना देण्यात येणारं जेवणही त्यांनी यावेळी त्यांच्यासोबत बसून घेतलं. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशीही संवाद साधला. पूरग्रस्तांचं पुनर्वसन लवकरात लवकर करावं लागेल. ज्या गावात दरड कोसळली, त्याच्या बाजूला एक गाव आहे. तिथं सुमारे २७५ घरं आहेत. त्यांच्यामध्येही भीती आहे. आता दरडीखाली गेलेल्या ९ घरांसह इतर घरांचंही एकत्रित पुनर्वसन करावं लागेल. अनेक कुटुंबांंमध्ये दोन मुलंच किंवा एखादीच व्यक्ती उरली आहे. त्यांचा काहीतरी वेगळा विचार सरकारला करावा लागेल. त्यांना नेमकी कशी मदत करता येईल हे पाहिलं गेलं पाहिजे,’ असं फडणवीस यांनी सांगितलं.