संपादकीय संवाद – आता जनसामान्यांनीच शहाणे होण्याची वेळ आलेली आहे

सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी नद्यांना पूर येऊन जनजीवन विस्कळीत होणे तसेच मालमत्तेचे नुकसान आणि जीवितहानी होणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर काल समाजमाध्यमांवर एक बातमी वाचण्यात आली, पश्चिम महाराष्ट्रातील एका गावामध्ये स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन गावाच्या काठाने जाणाऱ्या नदीचे पात्र स्वच्छ करून पुराची शक्यता टाळली आहे. अशी ती माहिती होती. ही माहिती म्हणजे एक सुखद धक्का होता.
गेल्या काही वर्षात नद्यांना वारंवार पूर येण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दरवर्षी पूर आले की पुरपीडितांना नुकसान भरपाई दिली जाते आणि काहीतरी थातुरमातुर उपाययोजना केल्या जातात मात्र, मुळाशी जाऊन समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न कधीच होत नाही. या प्राश्वभूमीवर समाजमाध्यमांवरील ही बातमी निश्चितच जनसामान्यांना मार्गदर्शक ठरणारी म्हटली जाऊ शकते.
गावाच्या बाजूने नदी वाहते ही नदी जीवनदायिनी म्हणून ओळखली जाते. नदीतील पाणी पिण्यासाठी आणि रोजच्या वापरासाठी तर वापरले जातेच पण त्याचबरोबर नदीकाठच्या शेतीलाही हे पाणी दिले जाते. गेल्या १०० वर्षात अनेक नद्यांवर धरणे बांधून त्याचे पाणी शेतीला देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर नदीचा आणखी एक उपयोग केला जातो गावातला सर्व काडीकचरा, गाळ त्याचबरोबर सांडपाणी हे सर्व गावकतही वाहणाऱ्या नदीतच सोडले जाते.
या सर्व प्रकारांमुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित होते, त्याचबरोबर कचरा आणि इतर चीजवस्तू या नदीच्या पाण्यात टाकल्या जातात त्या नदीच्या तळाशी जमा होतात. परिणामी नदीचे पात्र आक्रसते अश्यावेळी जेव्हा पावसाचे पाणी वाढते तेव्हा ते नदीचे तिर सोडून बाहेर सखल भागात धावू लागते. त्यालाच पूर येणे असे म्हणतात.
याशिवाय नदीच्या काठी अनेक बांधकामे केली जातात त्या बांधकामांचा मलबाही नदीतच फेकला जातो त्यामुळेही नदीचे पात्र आक्रसण्याचे प्रमाण वाढते. त्याचेच पर्यवसान पूर येण्यात होते.
२००५ मध्ये मुंबईत प्रचंड वृष्टी झाली होती, त्यावेळी उभी मुंबई ठप्प झाली होती. त्यादिवशी मुंबईतील मिठी नदीतून असेच पाणी रस्त्यावर आणि झोपडपट्ट्यांमध्ये शिरले होते. त्यावेळी मिठी नदी स्वच्छ करण्याबाबत प्रचंड खल झाला मात्र ते नियोजन कागदावरच राहिले. मिठी नदीत आजही तसाच कचरा पडतो आहे. आणि मिठी नदीचे पात्र आक्रसत जाते आहे.
प्रस्तुत बातमीतील गावातील नदीचे पात्रही असेच आक्रसले होते तिथल्या नागरिकांनी पुढाकार घेत, काही तज्ज्ञांची मदत घेतली आणि श्रमदान आणि सामूहिक वर्गणीतून संपूर्ण नदीचे पात्र उन्हाळा दिवसात स्वच्छ केले. पात्रातील सर्व गाळ आणि घाण काढून टाकले परिणामी नदीचे पात्र विस्तारले त्याचा फायदा होऊन यंदा त्या गावात एरवी असलेला पुराचा धोका टळला.
या बातमीतून सर्वच गाव आणि शहरातील नागरिकांनी बोध घ्यायला हवा. काही वर्षांपूर्वी नागपुरात अनिल सोले महापौर असताना त्यांनी नागपूरची नाग नदी स्वच्छ करण्याची मोहीम हाती घेतली होती. त्यावर्षी नाग नदी बऱ्यापैकी स्वच्छ झाली मात्र नदीकाठच्या नागरिकांना कधीच शहाणपण आले नाही. त्यांनी नाग नदीत तसाच कचरा टाकणे सुरु ठेवले परिणामी नाग नदीची अवस्था पुन्हा जैसे थे आहे. अश्या प्रकारात नागरिकांनी पुढाकार घेऊन असे कचरा टाकण्याचे प्रकार रोखले पाहिजे त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांनी अश्या प्रकारांमध्ये दंडात्मक कारवाई करायला हवी.
निसर्गाने आम्हला बऱ्याच सोइ करून दिल्या आहेत, मात्र त्याचा योग्य उपयोग करून उपभोग कसा घ्यायचा ते आम्हाला ठरवायचे आहे. आम्ही ते करायला चुकलो त्यामुळेच अस्मानी संकटे वाढतात, त्यामुळे आता जनसामान्यांनीच शहाणे होण्याची वेळ आलेली आहे.

अविनाश पाठक

Leave a Reply