चंद्रपूर : २७ जुलै – जन्मानंतर वयाच्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षीच सामान्य मुलं वरण-भात, बिस्कीट, चॉकलेट असे पदार्थ खायला सुरुवात करतात. पण चंद्रपूरातील एक मुलगा मात्र गेल्या १७ वर्षांपासून फक्त दुधावर जगत आहे. त्यानं आतापर्यंत अन्य पदार्थांचा एक कणही खाल्ला नाही. हे ऐकून अनेकांना धक्का बसेल पण हेच सत्य आहे. त्याला आतापर्यंत बिस्कीट किंवा चॉकलेटची चवही माहीत नाही. त्याचं एकमेव खाद्य दूध आहे. दूध नाही मिळालं तर हा मुलगा उपाशी पोटी झोपतो. पण अन्य कोणत्याही पदार्थाला तो शिवत देखील नाही.
भुजंग गुरुदास मडावी असं संबंधित १७ वर्षीय मुलाचं नाव आहे. तो चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील जामखुर्द येथील रहिवासी आहे. एकदम सामान्य मुलाप्रमाणे दिसणाऱ्या या मुलानं आतापर्यंत अनेक असामान्य अनुभव दिले आहेत. जन्मानंतर तब्बल १२ दिवस त्यानं डोळे उघडले नव्हते. तेराव्या दिवशी त्यानं डोळे उघडून पहिल्यांदा आपल्या आईचं दूध प्यायला आहे. त्यानंतर आतापर्यंत वयाच्या १७ व्या वर्षापर्यंत दूध हेच त्याचं एकमेव खाद्य बनलं आहे.
लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार, भुजंग सहा महिन्यांचा असताना, त्याला वरणभात, खिचडी असे पदार्थ खाऊ घालण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्यानं अन्नाचा कणही तोंडात घेतला नाही. यामुळे भुजंगच्या पालकांनी त्याला विविध डॉक्टरांकडे उपचारासाठी नेलं मात्र काहीही उपयोग झाला नाही. त्याची प्रकृती एकदम सामान्य मुलांप्रमाणे असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. तो सकाळी आणि रात्री प्रत्येक पावशेर दूध पिऊन तो जगत आहे. घरची परिस्थिती हलाखीची असल्यानं अनेकदा कुटुंबीयांकडे दूधासाठी पैसे नसतात, त्यामुळे त्याला उपाशीपोटी झोपावं लागतं. पण याची कोणतीही तक्रार तो आपल्या आई-वडिलांकडे करत नाही.
भुजंगला शाळेतही घातलं आहे. जामखुर्द येथील एका शाळेत त्यानं सातवी पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. पण त्याला अद्याप बोलता, लिहिता आणि वाचता येत नाही. वर्गात गेल्यानंतर तो नेहमी ध्यानमग्न अवस्थेत बसलेला असतो. वहीच्या पानावर रेषा ओढून आतापर्यंत तो शिक्षण घेत आहे. पण त्याची प्रकृत अन्य सामान्य मुलाप्रमाणे असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.