खोटी बंदूक हातात घेऊन फेसबुकच्या माध्यमाने दहशत पसरविण्याचा प्रयत्नांत असलेला तरुण अटकेत

चंद्रपूर : २७ जुलै – आजची तरुण पिढी गुन्हेगारी विश्वाकडे जास्त आकर्षिली जाताना दिसत आहे. अर्थात चांगल्या तरुणांची संख्याही चांगली आहे. पण दुसरीकडे काही तरुण गुन्हेगारी विश्वाकडे जास्त आकर्षिले जाताना दिसत आहेत. काही तरुणांना तर गुंडगिरी करण्याची हौस असते. पण अशा हौशी तरुणांना पोलीस बरोबर वठणीवर आणतात. असाच काहिसा प्रकार चंद्रपुरात बघायला मिळाला.
लोकांमध्ये आपल्याप्रती भीती निर्माण करणे, एरियाचा भाई होणं, गुंड होणं अशा काहिंच्या महत्त्वकांक्षा आहेत. लोकांमध्ये दहशत माजवून पुढे काही तरुण मोठा गंभीर स्वरुपाचा गुन्हा करतात. पण अशाच दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी पकडल्यानंतर त्याच्या बदमाशीची पोलखोल झाली आहे. चंद्रपूरच्या या तरुणाने फेसबुकवर हातात बंदूक घेतलेला फोटो शेअर केला होता. पण ती बंदूक खोटी होती, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली.
चंद्रपुरातील एका तरुणाने हातात बंदूक घेतलेला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. पण त्याचा हाच प्रताप त्याच्या अंगलटी आला आहे. सोशल मीडियावर हातात बंदूक असलेला फोटो शेअर करुन दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं. यावेळी त्यांची भंबेरी उडाली. तो प्रचंड घाबरला. पोलिसांनी त्याला बंदुकीबाबत विचारलं तेव्हा भलतीच काहितरी माहिती समोर आली.
तरुणाला समज देऊन सोडून दिलं
तरुणाने शेअर केल्या फोटोतील बंदूक ही बनावट आणि खोटी होती. ही बंदूक ऑनलाईन खरेदी करण्यात आलेली होती. पोलिसांनी त्याचे पुरावे देखील तपासले. त्यानंतर पोलिसांनी तरुणावर गुन्हा दाखल केला नाही. बल्लापूर पोलिसांनी संबंधित तरुणाला समज देऊन सोडून दिलं. पण पुन्हा असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, अशीही ताकीद दिली. बल्लारपूर शहरात गेल्या काही महिन्यात गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पोलीस सोशल मीडियातील बारीक-सारीक बाबींकडे देखील लक्ष देत आहे.

Leave a Reply