अमरावती : २५ जुलै – चार वर्ष एकमेकांवर जीवेपाड प्रेम केलं. पण, लग्नाची वेळ आली तेव्हा तरुणाने माघार घेतली. त्यामुळे प्रियकराने लैंगिक शोषण केल्यानंतर लग्नास नकार दिल्यामुळे प्रेयसीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना अमरावतीत घडली आहे. या प्रकरणावरून आज शहरात दीडशे ते दोनशे जणांचा जमाव पोलीस आयुक्त कार्यालय व पोलीस ठाण्यावर जाऊन धडकला. त्यानंतर अखेर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील फ्रेझरपुरा येथील रहिवासी असलेल्या उच्चशिक्षीत युवतीचे त्याच परिसरात राहणाऱ्या रोशन मेश्राम या तरुणासोबत गेल्या चार पाच वर्षापासून प्रेम संबंध होते. लग्नाचे आमिष दाखवून रोशने पीडितेला लैंगिक शोषण केले. मात्र पीडितेने जेव्हा लग्नाबद्दल विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तर दिली.
पीडित तरुणीने वारंवार त्याच्याकडे विचारणा केली पण प्रत्येक वेळी त्याने नकार दिला. नंतर हा वाद चिघळला. लग्नाबद्दल विचारणा केली असता रोशल पीडितेला फोनवर अश्लील शिवीगाळ धमक्या देऊन लग्नास नकार देत होता. त्यामुळे पीडित तरुणीने विष प्राशन केले. विष प्राशन केल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र, रात्री उशिरा या युवतीचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूमुळे परिसरात संताप पसरला होता. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करून कारवाई होत नसल्याचं आरोप करत पीडितेचे वडील व भावासह परिसरातील दीडशे ते दोनशे नागरिकांनी पोलीस आयुक्तालय फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यावर घेराव घातला.
जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मुलीचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका कुटुंबीयांनी व परिसरातील नागरिकांनी घेतली. अखेर नागरिकांच्या दबावापुढे पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपी रोशन मेश्राम व त्याच्या आईवर दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.