मोहाडीच्या तहसीलदारांना लाच घेताना रंगेहात अटक

भंडारा: २४ जुलै- रेती वाहतुकीवर कोणत्याही प्रकारची कारवाई न करण्याकरिता ट्रॅक्टर मालकाकडून ३० हजार रुपयाची लाच मागणाऱ्या भंडारा जिल्ह्यातील मोहाडीच्या तहसीलदारांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक करण्यात आली आहे. देविदास बोंबार्डे असे लाचखोर तहसीलदाराचे नाव आहे.
तक्रारदार हे रेतीचे व्यावसायिक असून त्यांच्याकडे दोन रेतीचे ट्रॅक्टर आहे. मोहाडी तालुक्यातील काही रेतीघाटावरून या ट्रॅक्टरच्या सहायाने अवैधरित्या रेती वाहतूक करण्याकरिता तहसीलदार देविदास बोंबार्डे यांनी लाचेची मागणी केली. प्रती ट्रॅक्टर १५ हजार रुपये या प्रमाणे दोन ट्रॅक्टरकरिता ३० हजार रुपये हप्त्याचे देण्याची मागणी करण्यात आली होती. परंतु तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने याची तक्रार भंडारा लाचलूचपत प्रतिबंधक विभागाला करण्यात आली. मोहाडी तहसील कार्यालयात सापळा कारवाई करण्यात आली. यावेळी तहसीलदार देविदास बोंबार्डे ३० हजारांची लाच स्विकारतांना रंगेहात पकडण्यात आले. देविदास बोंबार्डे यांच्याविरूध्द मोहाडी पोलिस ठाण्यात लाचलूचपत प्रतिबंधक कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply