गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे उघडले, विदर्भात अनेक जिल्ह्यात पावसाने दाणादाण

नागपूर : २४ जुलै- विदर्भात काही भागात अजूनही अतिवृष्टी कायम आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे सर्व दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले तर अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात चंद्रिका नदीला आलेल्या पुरामुळे सात ते आठ गावांचा संपर्क तुटला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे भिंत कोसळून महिलेचा मृत्यू झाला. महाराष्ट्र-तेलंगणा मार्ग बंद झाला आहे. गोसीखुर्द धरणातून ३३९०.५ क्युबेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात अतिवृष्टी कायम आहे. तालुक्यातील वर्धा नदी दुथडी भरून वाहत आहे. तालुक्यातील ४० गावांना या पावसाचा फटका बसला आहे. वेकोलिच्या सहाही कोळसा खाणींमध्ये उत्खननाचे काम ठप्प पडले.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील राणीगाव ते धारणी मार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक बंद असून, दहा गावांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील पूर्णा, शहानूर, सपन या मध्यम प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वर्धा जिल्ह्यातील पाच प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यवतमाळ जिल्ह्यातील बेंबळा व अडाण प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Leave a Reply