वर्धा जिल्ह्यात पुराच्या प्रवाहाने एक महिला व एक इसम बैलबंडीसह गेले वाहून

वर्धा : २३ जुलै – वाघाडी नदीच्या पुराच्या प्रवाहाने एक महिला वाहून गेली तर तास येथील संतोष शंभरकर बैल बंडीसह वाहून गेले. या दोघांचा वृत्त लिहिस्तोवर शोध लागला नव्हता. तालुका प्रशासनाकडून शोध मोहीम सुरु आहे. तालुक्यात गुरुवार २२ रोजी सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने नदी नाले ओसुंडून वाहत असल्याने २० गावांचा संपर्क तुटलेला आहे.
पोथरा नदीला पुराची पातळी वाढल्याने ४ गावांचा संपर्क तुटला आहे. सकाळीच कामानिमित्त बाहेरगावी गेलेले नागरिक अलीकडच्या गावात थांबालेले आहे. वडगाव ते पिंपळगाव मार्गाची वाहतूक पूर्णतः थांबालेली असून सायगाव्हाण सावंगी लोखंडी पिंपळगाव या गावाचा संपर्क तुटलेला आहे. समुद्रपूर तालुक्यातील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसात नाल्याला पूर आल्याने समुद्रपूर येथील महीला शेतातील कामे करून परत येत असताना वाघाडी नाल्यावरील पुलावरून येत असताना पाय घसरल्याने रंभा नामदेव मेश्राम (७०) ही महिला वाहून गेली तर तास येथील शेतकरी शेतातून परत येत असताना नाल्याला आलेल्या पुरात संतोष शंभरकर बैलबंडीसह वाहून गेले. पूर परिस्थितीवर तहसीलदार राजू रणवीर, नायब तहसीलदार के. डी. किरसान, समुद्रपूरचे ठाणेदार हेमंत चांदेवार, धर्मेंद्र तोमर, लक्ष्य ठेवून आहेत.
कोरा येथील लाल नाला प्रकल्प पुर्ण क्षमतेने भरला असुन बुधवारी रात्रीपासून पाचही दरवाजे २५ सें.मी. ने उघडण्यात आले. पाण्याचा विसर्ग 67.69 क्युमेक्स सुरु आहे. यामुळे नदी काठच्या गावांतील नागरिकांना प्रशासनाकडून सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Reply