या वर्षीही शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा राज्य शासनाचा निर्णय

मुंबई : २३ जुलै – कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर दुसरी लाट येऊन गेली आणि आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात सरसकट शाळा सुरू होण्याची शक्यता धूसर होत असून यंदाही शालेय अभ्यासक्रमात २५ टक्के कपात करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षणंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली आहे.
कोरोना संकटामुळे सर्वांनाच संकटाला सामोरं जावं लागत आहे. शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण मात्र सुरू आहे. ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण देताना अनेक मर्यादा शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर येतात. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांवरीलही ताण कमी करण्यासाठी शालेय अभ्यासक्रम 25 टक्के कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. त्यामुळे शिक्षकांवरील ताण काही प्रमाणात हलका होणार असून विद्यार्थ्यांच्या डोक्यावरील अभ्यासाचा ताणही कमी होणार आहे.
गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे शाळा सुरु होण्याची शक्यता दिसत ऩसल्याने 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. 2021 साली अशी गरज पडणार नाही, असा सर्वांचा अंदाज होता. मात्र कोरोनाची आलेली दुसरी लाट आणि आता वर्तवली जाणारी तिसऱ्या लाटेची शक्यता यामुळे नजिकच्या भविष्यकाळात शाळा सुरु होण्याची शक्यता धूसरच आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत राज्य सरकारनं 25 टक्के अभ्यासक्रम कमी करत असल्याची घोषणा केली आहे.
ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत असल्यामुळे अनेक शिक्षक संघटना, मुख्याध्यापक यांनी शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याची मागणी शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांच्याकडे केली होती. राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य मंडळाच्या शाळेतील अभ्यासक्रमात कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.

Leave a Reply