मुंबई : २३ जुलै – राज्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मात्र कोकणात पावसामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. रत्नागिरी जिह्यातील चिपळूण आणि खेडमध्ये परिस्थिती बिकट आहे. कोकणातील याच परिस्थितीचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतला, स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून कोकणातील पूर परीस्थितीची माहिती घेतली. तसेच केंद्र सरकारकडून सर्व मदत करण्याचेही आश्वासन दिले आहे.
राज्यातील पूर परिस्थितीसंदर्भात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना राज्य शासनामार्फत बचाव कार्य कसे सुरू आहे त्याचप्रमाणे कुठल्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याची माहिती दिली. बचाव आणि मदत कार्यात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
गेल्या 24 तासांत अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथील परिस्थिती अतिबिकट बनली. चिपळूणला महापुराचा विळखा बसला असून संपूर्ण शहर चहुबाजूने पाण्यात आहे. हजारो लोक पुरात अडकले असून एनडीआरफच्या टीम बचावकार्यासाठी दाखल झाल्या आहेत. रत्नागिरीत 1 जुलै ते 22 जुलैपर्यंत 1781.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे आणि हा 40 वर्षातला उच्चांक आहे. मागील 10 दिवसात 1426.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 2011 साली जुलै महिन्यात 1732 मिमी पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्याच्या सरासरीच्या तुलनेत 183 टक्के पाऊस झाला आहे.