चिपळूण : २३ जुलै – पावसाच्या थैमानामुळे निर्माण झालेली महाराष्ट्रावरील संकटाची मालिका थांबताना दिसत नाही. चिपळूणमध्ये दरडी कोसळून ३८ लोक दगावल्याची घटना ताजी असतानाच कोविड सेंटरमध्ये पाण्याचा लोट आल्यामुळे व्हेंटिलेटरवरील ८ रुग्ण दगावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
गेल्या चार दिवसांपासून कोकणात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे कोकणात अनेक भागात पूर आला आहे. चिपळूणमधील कोविड सेंटर असलेल्या अपरांत हॉस्पिटलमध्येही काल संध्याकाळी पाण्याचा मोठा लोट आला. त्यामुळे संपूर्ण कोविड सेंटरमध्ये पाणीच पाणी आणि चिखल झाला. त्यामुळे या कोविड सेंटरमधील वीज पुरवठा खंडीत झाल्याने व्हेंटिलेटरवर असलेल्या 8 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
चिपळूणच्या कोविड सेंटरमध्ये पाण्याचा लोट आल्याने संपूर्ण कोविड सेंटरमध्ये पाणीच पाणी झाले. त्यामुळे स्थानिक तरुणांनी जीवाची पर्वा न करता कोविड सेंटरमध्ये धाव घेऊन रुग्णांना पटापट बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला. मात्र, कंबरेभर पाणी, अंधार यामुळे त्यांचे प्रयत्न तोकडे पडले. या कोविड सेंटरमध्ये जनरेटर होते. पण कुणालाही जनरेटर चालू कसं करायचं माहीत नव्हतं. त्यामुळे कोविड सेंटरमधला वीज पुरवठा सुरू होऊ शकला नाही. परिणामी व्हेंटिलेटरवरील रुग्णांचा मृत्यू झाला. या रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरेसा साठा होता. एकूण 30 सिलेंडर रुग्णालयात होते. पण जनरेटरवर पाणी गेल्यामुळे जनरेटर बंद झालं आणि मॉनिटरवर त्याचा परिणाम झाला.
पुराच्या पाण्यामुळे संपूर्ण कोविड सेंटर उद्ध्वस्त झालं आहे. प्रत्येक वॉर्डात पाणी भरलं आहे. चिखलाचं साम्राज्य झालं आहे. रुग्णालयाच्या बाहेरही प्रचंड घाण झाली आहे. रुग्णवाहिका पाण्यात बुडाल्या आहेत. तर कोविड सेंटरवरचे पत्रे उडाली आहे
या हॉस्पिटलमध्ये एकूण २० रुग्ण होते. त्यापैकी ८ जण दगावले असून १२ जणांना शासकीय रुग्णालय आणि इतर रुग्णालयात हलवण्यात आले आहे.