सद्गुरू या धरतीवर सज्ञानाचा विस्तार करण्यासाठीच अवतरतात.खरे पाहता गुरुशिवाय ज्ञानाला महत्व येत नाही.एवढेच काय तर त्यांच्याशिवाय ज्ञान आत्मसात करणे शक्यच नाही.एका व्यक्तीला त्याच्या आयुष्यात खुप दुःख, समस्या आहे असे मनोमन वाटले.एवढे दुःख, समस्या आपल्या एकट्याच्याच वाट्याला का आल्या असतील याचा तो सतत विचार करीत होता. आपल्या मनातील भावना विचार आपण गुरूं जवळ बोलून दाखवाव्या या हेतूने ती व्यक्ती आपल्या गुरूंकडे गेली आणि आपली दुःख, समस्या त्यांचे समोर मांडून मला यातून मुक्तता कशी मिळेल यावर उपाय सांगावा अशी प्रार्थना केली.शिष्याचा प्रश्न कठीण होता.पण त्यावर उपाय काढण्यासाठी गुरूंनी शिष्याला जवळ बोलावून ” एक काम करा ,जी व्यक्ती सर्वात सुखी आहे असे वाटते त्याचे रोज घालत असलेले जोडे घेऊन ये.नंतरच मी तुला दुःख आणि समस्यातून सुटका होण्याचा मार्ग सांगू शकेल.” ती व्यक्ती एका घरी गेली आणि त्या घरातील व्यक्तीला “तुम्ही फार सुखी दिसता तेव्हा एक दिवसासाठी मला तुमचा जोडा द्याल का?” असे विचारताच ” माझा शेजारी एवढा बदमाश आहे,तो सतत भांडतो,त्रास देत असतो अशा स्थितीत मी कसा सुखी राहू शकेल?” असे सांगून त्या व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखवला.पुढे असे करत करत त्याने अनेक घरी संपर्क केला परंतू प्रत्येकाने विविध कारणे देऊन आम्ही सुखी नाही हेच सांगितले.जोडे मागायला गेलेला शिष्याला स्वत:चेच जोडे झीजवावे लागले.
काही दिवसांनी शिष्य आपल्या गुरूंकडे गेला.गुरूंना सर्व हकिकत सांगितली.त्यावर गुरूने शिष्याला सांगितले की,” प्रत्येकाने दुसऱ्यांकडे लक्ष न देता आपण आपल्यात असलेली कमतरता ओळखायला हवी.जीवन ही एक यात्रा आहे.दुसऱ्यांकडे पाहून आपले रस्ते बदलायचे नसतात.आपल्या स्वत:कडे पहा आणि स्वत:चे ऐका.हाच खरा सुखाचा मंत्र आहे.”
यावर शिष्याने गुरूला म्हटले, ही गोष्ट आपण मला पहिलेच सांगू शकले असते. त्यामुळे माझे इतरांच्या दारोदार फिरणे वाचले असते.
पण मी हे अगोदरच सांगितले असते तर तुझा विश्वास बसला नसता.तु हे मानले नसते.सुख मिळविण्यासाठी तु जे घरोघरी परिक्रमा केली त्यावरून जगात सुखी कुणीच नाही.सुख कशात आहे हे आपल्या मानण्यावर आहे.सुख प्राप्तीसाठी जे कष्ट घेतले ते तू जीवनभर विसरणार नाही.असे गुरूंनी शिष्याला सांगितले.हाच गुरू मंत्र शिष्याला मिळाला.
प्राचिन गुरू शिष्य परंपरेने भारताला ज्ञानाच्या क्षेत्रात फार मोठे महत्त्व प्राप्त करून दिले आहे.गुरूशिष्याची ही थोर परंपरा पुन्हा पुनरूज्जीवित करण्याची आज फार आवश्यकता आहे.सदगुरू हे परिसा सारखे असतात.ते प्रत्यक्ष असो वा नसो त्यांची सुक्ष्म कार्यशक्ती सदैव कार्यशील राहात असते.ज्या उद्येशासाठी त्यांचे या जगात अवतरण झाले असते,त्यांची पूर्ती होईपर्यंत त्यांचा प्रभाव कायम राहतो.
आज गुरूपौर्णिमा.
प्रत्येकाला कोणी ना कोणी गुरू असतो.माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो.आयुष्याच्या प्रत्येक वळनावर,प्रत्येक टप्प्यावर,क्षणाक्षणाला भेटलेल्या आणि भेटणाऱ्या त्या माझ्या असंख्य गुरूंना शतशः वंदन.
आदी गुरूसी वंदावे
मग साधन साधावे
गुरू म्हणजे माय – बाप
नाम घेता हरतील पाप
गुरू म्हणजे आहे काशी
साती तिर्थ त्या पाशी
तुका म्हणे ऐसे गुरू
चरण त्याचे हृदयी धरू.
आपण आपल्या गुरूंना शतशः नमन करू या.
आपल्याला आणि आपल्या परिवाराला गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.
रवींद्र गोविंद पांडे