नागपूर : २३ जुलै – साहित्य विहार या नागपुरात कार्यरत असलेल्या साहित्यिक संघटनेच्या वतीने वर्ष २०२० मध्ये आयोजित करण्यात आलेल्या उत्कृष्ट वाङ्मय स्पर्धेत वैचारिक साहित्य या विभागात ज्येष्ठ पत्रकार, स्तंभलेखक आणि साहित्यिक श्री अविनाश पाठक लिखित दृष्टिक्षेप या वैचारिक लेखसंग्रहाला योगेश पटवर्धन स्मृती उत्कृष्ट वैचारिक साहित्य पुरस्कार आज प्रदान करण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे, कवी कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे महाकवी सुधाकर गायधनी, डॉ. प्रज्ञा आपटे प्रभृती मान्यवरांच्या हस्ते आज दुपारी झालेल्या एका समारंभात हा पुरस्कार अविनाश पाठक यांना प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, मानपत्र रोख रकम आणि ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
अविनाश पाठक लिखित दृष्टिक्षेप हा त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या वैचारिक लेखांचा संग्रह असून यात २२ लेखांचा समावेश करण्यात आला आहे. या ग्रंथाला ज्येष्ठ पत्रकार श्री ल. त्र्यं. जोशी यांची प्रस्तावना लाभली आहे. मुंबईच्या भरारी प्रकाशनानाने हे पुस्तक मुद्रित स्वरूपात आणि ईबुक म्हणून अमॅझॉनवरही प्रकाशित केले आहे. गतवर्षी १३ नोव्हेंबर २०२० रोजी महाराष्ट्राचे महामहिम राज्यपाल श्री भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले होते.
श्री अविनाश पाठक यांची आतापर्यंत १४ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यात एक कादंबरी, दोन राजकीय कथांचे संग्रह, ५ ललित लेखांचे संग्रह, ४ वैचारिक लेखसंग्रह एक संपादित पुस्तक आणि कोळसा घोटाळ्यावर प्रकाश टाकणारे काळ्या कोळश्याची काळी कहाणी हे पुस्तक यांचा समावेश आहे. श्री पाठक यांना विविध पुस्तक लेखनाबद्दल आणि पत्रकारितेतील लेखनाबद्दल विविध पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.