नागपूर : २२ जुलै – महाराष्ट्रातील विविध भागांत जोरदार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे कोकण कोल्हापूर पाठोपाठ पावसाने आता विदर्भातही जोर धरला आहे. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अमरावती, अकोला, वाशीम जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असतानाच नागपूर जिल्ह्यातही कालपासून सुरु असलेल्या संततधार पावसाने नागरिकांना हैराण करून सोडले आहे.
आज सकाळपासून नागपूर शहरात पावसाच्या सरीवर सारी कोसळत आहेत. दुपारपासून सारखा सुरु असलेला पाऊस थोड्या वेलची उसंत दिली की परत आणखी जोरात सुरु होत आहे. सतत सुरु असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. शहरातील रस्ते जलमय झाले असून सखोल भागातील घरांमध्ये पाणी साचले आहे. अग्निशामक विभागाकडे याबद्दल अनेक तक्रारी आल्या असून त्या तक्रारींवर कारवाई सुरु आहे. विदर्भात ऑरेंज अलर्ट जरी करण्यात आला असून ४८ तासांत नागपूर जिल्ह्यासह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा नागपूर वेध शाळेने दिला आहे. मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.