मुंबई : २२ जुलै – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना एक मोठा झटका बसला आहे. कारण, अनिल देशमुख यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात केली होती. ही मागणी करणारी याचिका आज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचं दिसत आहे.
राज्य सरकारची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. दोन आठवडे स्थगिती देण्यासही मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. स्थगिती दिल्यास तपासात हस्तक्षेप केल्या सारखे होईल असे उच्च न्यायालयाने म्हणत याचिका फेटाळली आहे. न्यायमूर्ती संदिप शिंदे आणि न्यायमुर्ती एन जे जामदार यांनी ही याचिका फेटाळली आहे.
सीबीआयने अनिल देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा या मागणीसाठी राज्य सरकारकडून मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. या याचिकेत अनिल देशमुख यांनी म्हटलं होतं, माझ्या विरोधात कोणतेही पुरावे नसताना गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजकीय द्वेषाने हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकत आपल्याला अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या या आरोपांनंतर सीबीआयने त्यांच्या विरोधात प्राथमिक चौकशी करुन गुन्हा दाखल केला होता.
सीबीआयने दाखल केलेला हा गुन्हा मागे घेण्यासाठी अनिल देशमुख यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख यांची ही याचिका फेटाळली आहे. अनिल देशमुख यांच्यासाठी हा एक मोठा झटका असल्याच ंबोललं जात आहे.