अमरावती : २२ जुलै – अमरावती शहरात गेल्या दोन महिन्यात हत्येच्या पाच घटना घडल्या. पुन्हा जुन्या वादातून महादेव खोरी परिसरात एका तरुणाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. बाल्या उर्फ प्रणय मधुकर सातनूरकर (२४) असे, मृतकाचे नाव आहे. या हत्याप्रकरणातील पाचही आरोपी पसार झाले असून, फ्रेजरपुरा पोलिस आरोपींचा कसून शोध घेत आहेत.
प्रणय सातनूरकर हा लाकूड काम करीत होता. त्याचा काही महिन्यांपूर्वी परिसरातील युवकांसोबत वाद झाला होता. त्यावेळी पोलिसांनी प्रणयसह आरोपींविरुध्द गुन्हे नोंदविले आहे. परंतु, तोच वाद मनात धरून चार ते पाच आरोपींनी बाल्या सातनुरकरला परिसरातच गाठून त्याच्यावर चाकूने हल्ला चढविला. या हल्ल्यात बाल्या सातनुरकर हा रक्ताच्या थारोळ्यात घटनास्थळी पडून होता.
घटनेची माहिती मिळताच फ्रेजरपुरा ठाण्याचे पोलिस निरीक्षक पुंडलिक मेश्राम, दुय्यम पोलिस निरीक्षक नितीन मगर, पोलिस उपनिरीक्षक गजानन सोनुले यांच्यासह पोलिस ताफा घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी घटनास्थळावरून एक चाकू जप्त केला आहे. त्यांनी तत्काळ प्रणयला उचलून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेले. परंतु, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी प्रणयचे वडील मधुकर सातनूरकर यांच्या तक्रारीवरून मंगेश कावळे, अनिकेत खीराडे, ब्रिजेश गुप्ता याच्या सह अन्य तिघांविरुद्व भादंविच्या कलम 302 अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पोलिस पसार झालेल्या आरोपींचा शोध घेत आहे.