कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांचे पायउतार होण्याचे संकेत

बंगळुरु: २२ जुलै- कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी बंगळुरुत धन्वंतरी होमहवनाला हजेरी लावल्यानंतर आज गुरुवारी सकाळी मुख्यमंत्रिपद सोडण्याबाबत भाष्य केलं. पदावरुन पायउतार होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. कर्नाटकात नेतृत्वबदल होण्याच्या चर्चा सुरु असतानाच गेल्या आठवड्यात येदियुरप्पा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर कोणत्याही क्षणी येदियुरप्पा यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा मागितला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२५ जुलैला हायकमांडकडून मला नोटीस मिळणार आहे. त्यानुसार मी पुढचा निर्णय घेईन. पक्ष मजबूत करणे आणि पुढील निवडणुकांमध्ये पक्षाला पुन्हा सत्तेत आणणे, या दृष्टीने माझी पुढची वाटचाल असेल. मी दिवसरात्र त्यासाठीच मेहनत करत असतो, कृपया सहकार्य करा” असं वक्तव्य कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी केलं.
भाजपचा प्रामाणिक कार्यकर्ता असल्याचा मला अभिमान आहे. पक्षाच्या आदेशाचं पालन करत सेवा करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. माझ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की त्यांनी पक्षशिस्तीचं पालन करावं. आंदोलन किंवा बेशिस्तीचं दर्शन घडवून पक्षाला लज्जास्पद ठरणारं वर्तन करु नये, असं ट्वीट त्यांनी बुधवारी रात्री केलं होतं.
२६ जुलैला येदियुरप्पा सरकार दोन वर्ष पूर्ण करणार आहे. मात्र, नेतृत्व बदलाच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर येदियुरप्पा यांनी भाजप आमदारांसाठी आयोजित केलेल्या स्नेहभोजनालाही स्थगिती दिली आहे.

Leave a Reply