रायपूर : २१ जुलै – छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील जिल्हा रुग्णालयात मंगळवारी रात्री सात बालकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर मृत बालकांच्या कुटुंबियांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत मोठा गोंधळ घातला. बालकांची तब्येत बिघडल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना ऑक्सिजन न लावताच दुसऱ्या रुग्णालयात रेफर केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तर रुग्णालयाचे नर्सरी इन्चार्ज डॉ. ओंकार खंडेलवाल यांनी हे आरोप फेटाळून लावताना २४ तासांत केवळ दोन बालकांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे.
रुग्णालयात ऑक्जिजनचा तुटवडा नसून पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा साठा उपलब्ध आहे असे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे. मंगळवारी रुग्णालयात १५ हून अधिक बालके व्हेंटिलेटरवर होते. ऑक्सिजनचा तुटवडा असता तर सर्वांचाच मृत्यू झाला असता. सध्या रुग्णालयात ३७ बालके दाखल असून यापैकी २३ बालकांची प्रकृती चिंताजनक आहे असे रुग्णालय प्रशासनाने म्हटले आहे.
बालकाची प्रकृती बिघडल्यानंतर डॉक्टरांनी त्याला खासगी रुग्णालयात रेफर केल्याचे घनश्याम सिन्हा यांनी सांगितले. त्यांची पत्नी प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. बालकाची प्रकृती गंभीर होती, त्याला दुसरीकडे हलविण्यासाठी ऑक्सिजनची गरज होती. मात्र रुग्णालय प्रशासनाने असे केले नाही. आम्ही सातत्याने ऑक्सिजन सिलिंडरची मागणी केली, यादरम्यान आणखी दोन बालकांचा मृत्यू झाला आणि मृत बालकांच्या कुटुंबीयांनी गोंधळ घालण्यास सुरूवात केल्याचे सिन्हा यांनी सांगितले.
बालकांच्या मृत्यूनंतर जिल्हा रुग्णालयात रात्री एकच गोंधळ झाला. रुग्णालयाकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप मृत बालकांच्या कुटुंबीयांनी केला. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अडीच तासांनी नातेवाईक शांत झाले. रात्री ११ वाजेपर्यंत तीन बालकांच्या मृतदेहांसह कुटुंबीय परत गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. एका प्रत्यक्षदर्शीच्या माहितीनुसार त्याने रुग्णालयातून सात मृतदेह बाहेर काढताना पाहिले. दर दोन तासांनी एका बालकाचा मृतदेह रुग्णालयाच्या बाहेर काढला जात होता. दोन बालकांवर गेल्या तीन दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र त्यांच्या प्रकृतीविषयी कसलिही माहिती मिळत नव्हती असे या प्रत्यक्षदर्शीने म्हटले आहे.