घ्या समजून राजेहो! – राजकीय वाटचालीच्या पाचव्या टप्प्यावरील देवेंद्र

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र गंगाधरराव फडणवीस हे दिनांक २२ जुलै २०२१ रोजी वयाची ५१ वर्षे पूर्ण करून ५२व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. या निमित्याने पंचनामा परिवारातर्फे त्यांना खूप-खूप शुभेच्छा! त्यांची वाटचाल अशीच दमदार होत राहो आणि अजूनही उच्चतम पदांवर ते पोहचून यशस्वी होवोत, यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना.
देवेंद्र फडणवीस यांची राजकीय वाटचाल अभ्यासून त्यावर काही मतप्रदर्शन करायचे झाल्यास, धडाकेबाज हा एकच शब्द पुरेसा ठरेल. वयाच्या २१व्या वर्षापर्यंत राजकारणाचा विचारही न करणारा हा युवक २२व्या वर्षी नागपूर महापालिकेत नगरसेवक होतो आणि तिथून पुढे महापौर, आमदार, पक्षाचा प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री आणि आता विरोधी पक्षनेता, असे टप्पे गाठतच जातो आणि भविष्यातही पुढे येईल ती जबाबदारी पार पाडायला सज्ज असतो, हे एक अनाकलनीय कोडेच म्हणावे लागेल. देवेंद्रजींची राजकीय वाटचाल जेमतेम ३० वर्षांची आहे. या वाटचालीचे मूल्यमापन करताना ही वाटचाल पाच टप्प्यांवर विभागली जाऊ शकते. त्यातील पहिला टप्पा हा नागपूर महापालिकेतील कार्यकाळाचा, दुसरा टप्पा विधिमंडळात आमदार म्हणून केलेल्या वाटचालीचा, तिसरा टप्पा भाजपचा प्रदेशाध्यक्ष म्हणून केलेल्या कामगिरीचा, चौथा टप्पा राज्याचा मुख्यमंत्री म्हणून पूर्ण केलेल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीचा आणि आज पाचवा टप्पा हा विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून सत्ताधाऱ्यांना दहशत बसवणाऱ्या वाटचालीचा, असे विभाजन करता येईल. या पाचही टप्प्यांचे सिंहावलोकन करण्याचा प्रयत्न या लेखात केला जाणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांचा जन्म विदर्भातल्या सधन शेतकरी कुटुंबातला. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल परिसरात फडणवीस परिवाराची भातशेती होती. हे तिथले मालगुजार होते. देवेंद्रजींचे वडील गंगाधरराव हे व्यवसायासाठी नागपुरात आले आणि राजकारणात सक्रिय झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले गंगाधरराव पुढे भारतीय जनसंघात सक्रिय झाले. नागपूर महानगरपालिकेत आधी नगरसेवक, मग, उपमहापौर, नंतर पदवीधर मतदारसंघातील आमदार अशी त्यांची वाटचाल राहिली. आणीबाणी काळात त्यांनी १८ महिन्यांचा तुरुंगवासही भोगला.
अशा राजकीय वातावरणात लहानाचे मोठे झालेले देवेंद्रजी मात्र, राजकारणापासून दूर होते. १९८८मध्ये गंगाधररावांचे कर्करोगामुळे निधन झाले. त्यावेळी देवेंद्र जेमतेम १८ वर्षांचा होता. एलएल.बी.चा अभ्यास करत असणारा देवेंद्र हादेखील संघाचा कट्टर स्वयंसेवक होता. एलएल.बी. करून वकिली करायची आणि संघकार्यात झोकून द्यायचे, असा त्यांचा बेत होता. १९९१मध्ये एलएल.बी.ची परीक्षा पास केल्यावर अँड. श्रीहरी अणेंकडे देवेंद्रजी ज्यूनियर म्हणून कामाला लागले. १९९२च्या फेब्रुवारी महिन्यात नागपूर महापालिकेच्या निवडणुका होत्या. त्यावेळी संघाने सूचना दिली म्हणून देवेंद्रजी निवडणुकीला उभे राहिले आणि विजयीसुद्धा झाले. इथूनच त्यांची पहिल्या टप्प्यावरील राजकीय वाटचाल सुरू झाली.
नगरसेवक म्हणून पहिल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत देवेंद्रजींनी चांगलीच धमाल केली. तरूण वय असल्यामुळे ते अतिशय आक्रमक होते, मात्र, त्या आक्रमकतेला अभ्यासाची जोड होती. कायद्याचे सखोल ज्ञान असल्यामुळे प्रत्येक बाबीचे काटेकार विश्लेषण करून ते प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करायचे. त्यामुळे पहिल्या पाच वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी राजकारणात स्वत:चे स्थान बनविले होते.
1997मध्ये नागपूर महापालिकेच्या पुन्हा निवडणुका झाल्या. या निवडणुकीतही देवेंद्रजी प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. पाठोपाठच ते नागपूर नगरीचे महापौर म्हणून पदारूढ झाले. नागपूर नगरीचे सर्वात तरूण महापौर म्हणून त्यांची नोंद झाली होती. १९९८मध्ये नागपूर महापालिकेत मेयर इन कौन्सिल पद्धती लागू झाली. त्यावेळी या मेयर इन कौन्सिल पद्धतीतील पहिले महापौर म्हणून देवेंद्रजींची निवड झाली, मात्र, ही मेयर इन कौन्सिल पद्धती अल्पजीवी ठरली. चार-पाच महिन्यांतच राज्य शासनाने रद्दबातल केली. परिणामी, देवेंद्रजींना जास्त काळ या पदावर काम करता आले नाही.
१९९९मध्ये महाराष्ट्रात विधानसभेच्या मुदतपूर्व निवडणुका लागल्या. महापालिकेतील तडफदार कामगिरी लक्षात घेता त्यांना पक्षनेतृत्वाने विधानसभेतही संधी दिली. ऑक्टोबर १९९९मध्ये ते पश्चिम नागपूर मतदारसंघातून विधानसभेचे आमदार म्हणून निवडून आले. हा त्यांच्या राजकीय वाटचालीचा दुसरा टप्पा होता.
विधानसभेतही अल्पावधीत देवेंद्रजींनी आपली जागा निर्माण केली. त्यावेळी भाजप विरोधी पक्षात होता. विरोधी पक्षाचा एक धडाकेबाज, आक्रमक आणि अभ्यासू आमदार म्हणून त्यांचे स्थान निर्माण झाले. त्यावेळी देवेंद्रजी अविवाहित होते. अनेकदा त्यांच्या अभ्यासू प्रतिपादनाने सत्ताधारी पक्षातील मंत्री आणि नेते अडचणीत यायचे. अशावेळी मग देवेंद्रजींच्या न झालेल्या लग्नाचा विषय काढून ते वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करायचे. मला आठवते २००२च्या हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या वेगळ्या राज्यासंबंधी देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत ठराव मांडला होता. या ठरावावर घमासान चर्चा झाली. त्यावेळी अर्थमंत्री जयंत पाटील होते. देवेंद्रजींच्या अभ्यासपूर्ण प्रतिपादनाचा प्रतिवाद करून विदर्भाचे वेगळे राज्य नाकारणे जयंत पाटील यांना बरेच जड जात होते. त्यावेळी त्यांनी मग देवेंद्रजींच्या लग्नाचा विषय काढला. महाराष्ट्र एकसंघ राहण्याच्या दृष्टीने आता, देवेंद्रजींनी पश्चिम महाराष्ट्रातील मुलीशी पहिले लग्न करावे, असे सुचवून त्यांनी सभागृहातील ताण कमी करण्याचा प्रयत्न केला. ही चर्चा आटोपल्यावर विधानभवनाच्या पायर्यांवर गोपीनाथजी मुंडेंनी देवेंद्रजींचे तोंडभरून कौतुक केले. जांबुवंतराव धोटे एक अभ्यासू विदर्भवादी आहेत. आता त्या पाठोपाठ तू दुसरा विदर्भवादी बनला आहेस, अशा शब्दांत गोपीनाथजींनी देवेंद्रजींची पाठ थोपटली.
आपल्या देशात विधिमंडळाचे कायदे बनवताना त्यात अनेक सांसदीय तरतुदी केल्या आहेत. या तरतुदींचा नीट अभ्यास करूंन त्या वापरल्या या तरतुदींचा उपयोग सांसदीय आयुधे म्हणून करता येतो, हे देवेंद्रजींनी ताडले होते. या सर्व आयुधांचा सखोल अभ्यास करून त्यांनी अनेक प्रश्नांची सोडवणूक केली. आक्रमकपणामुळे दोन-तीनदा निलंबनाचीही पाळी आली होती, मात्र त्यांच्या अभ्यासुपणामुळे कॉमनवेल्थ पार्लमेंटरी फोरमतर्फे त्यांना उत्कृष्ट आमदार पुरस्कार देऊनही गौरवण्यात आले होते.
याच वाटचालीच्या दुसऱ्या टप्प्यात त्यांना पक्षस्तरावरही जबाबदाऱ्या दिल्या जात होत्या. आधी पक्षाच्या युवा शाखेचे ते सरचिटणीस होते. नंतर भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश शाखेचे ते सरचिटणीस झाले. दीर्घ काळ त्यांनी या पदावर काम केले. विधानसभेत आणि रस्त्यावर त्यांनी सारखेच योगदान दिले.
२०१३मध्ये भाजपचे तत्कालीन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांचा कार्यकाळ संपुष्टात आला होता. त्यावेळी पक्षाने तरुण तडफदार नेतृत्व हवे म्हणून देवेंद्रजींना नियुक्त केले. प्रदेशाध्यक्ष झाल्यामुळे त्यांच्या कर्तृत्वाला नवे क्षितीज मिळाले. हा त्यांच्या राजकीय वाटचालीतील तिसरा टप्पा होता. या काळात महाराष्ट्रातला प्रत्येक जिल्हा ते फिरून आले. गावखेड्यापर्यंत जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याच काळात २०१४च्या लोकसभा निवडणुका आल्या. भाजपची महाराष्ट्राची जबाबदारी देवेंद्रजींच्याच खांद्यावर होती. त्यांनी काटेकोर नियोजन करून निवडणुका लढवल्या. मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला सोबत घेतले. सर्व कार्यकर्त्याना प्रेमाने समजावत कामाला लावले, परिणामी, शिवसेना-भाजप युतीच्या वाट्यात महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी ४२ जागांचे घसघशीत दान आले. हा देवेंद्रजींच्या काटेकोर रणनीतीचाच विजय होता.
लोकसभा निवडणुका आटोपल्या आणि विधानसभा निवडणुकांच्या हालचाली सुरू झाल्या. त्यावेळी महाराष्ट्र भाजपात गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी या दोघांचे वर्चस्व होते. नितीन गडकरींना राज्याच्या राजकारणात फारसा रस नव्हता, मात्र गोपीनाथजी मुख्यमंत्री म्हणून राज्यात येण्यास इच्छुक होते, अर्थात नियतीला ते मान्य नव्हते. त्यामुळे जून २०१४मध्ये गोपीनाथजींचे अपघाती निधन झाले. गोपीनाथजींनंतर कोण, असे विचारले जाऊ लागले.
या नंतर दोनच महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका आल्या. यावेळीही शिवसेना-भाजप युतीची सरकार राहील, अशी अपेक्षा होती, मात्र, शिवसेनेची अडवणुकीची भूमिका होती, म्हणून अखेरच्या क्षणी भाजपने शिवसेनेशी असलेली युती तोडली. याच दरम्यान, विरोधातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही आघाडी तुटली होती. परिणामी, राज्यात चौरंगी लढती झाल्या. यावेळेसही देवेंद्रजींनी अक्षरश: जीवाचे रान केले. राज्यातील सर्व जागा लढवून १२२ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी केलेत. यावेळी पक्षश्रेष्टींनी भाजपचा महाराष्ट्रातील पहिला मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींना संधी दिली. हा देवेंद्रजींच्या राजकीय वाटचालीतील चौथा टप्पा म्हणता येईल.
चौथ्या टप्प्याच्या वाटचालीत देवेंद्रजींनी वसंतराव नाईकानंतर ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारा मुख्यमंत्री म्हणून आपले स्थान इतिहासात निर्माण केले. यावेळी भाजपजवळ पूर्ण बहुमत नव्हते शिवसेना कायम भांडणाच्या पवित्र्यात होती. अश्यावेळी शिवसेनेला सोबत घेऊन सरकार चालवणे ही एक कसरत होती. मात्र या कसरतीत देवेन्द्रजी शतप्रतिशत यशस्वी झाले. एक उत्तम प्रशासक आणि अभ्यासू नेता अशी त्यांची पप्रतिमा बनली राज्यात अनेक नवे प्रकल्प त्यांनी उभारले. समृद्धी महामार्ग, शेततळे योजना, नागपूर,पुणे आणि मुंबईतील मेट्रो रेल्वे अश्या अनेक प्रकल्पांचे श्रेय त्यांच्याकडेच जाते.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकत्र होते, भाजपला १०६ तर शिवसेनेला ५६ जागा मिळाल्या होत्या, ऐनवेळी शिवसेनेची सत्ता लालसा वाढली होती. वळासाहेबांच्या खोलीत अमितभाईंनी अडीच वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊ असा शब्द दिला होता, असे सांगत त्यांनी भाजपला अडचणीत पकडण्याचा प्रयत्न केला होता, परिणामी निवडणुकीपूर्वीची युती निवडणुकीनंतर तुटली राज्यात सर्वस्त मोठा पक्ष म्हणून निवडून आल्यावरही भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. यावेळी देवेंद्र फडणवीसांना विरोधी पक्षनेतेपदाचा मान मिळाला. हा देवेंद्रजींच्या राजकीय वाटचालीतील पाचवा टप्पा म्हणता येईल.
यावेळी राज्यात सत्तेवर आलेले सरकार हे पूर्णतः अनैसर्गिक आणि तत्वशून्य आघाडीतून पुढे आलेले सरकार होते. या सरकारशी संघर्ष करायचा तर विरोधी पक्षनेताही तितकाच खमका असणे गरजेचे होते. ती अपेक्षा देवेंद्रजींनी निश्चितच पूर्ण केली आहे. एक जागरूक विरोधी पक्षनेता म्हणून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्यात ते यशस्वी झाले आहेत. या काळातही अनेकप्रकरणे बाहेर काढण्याचे काम ते निष्ठेने करीत आहेत. सचिन वाझेंचे प्रकरण आणि त्यातून पुढे अनिल देशमुखांना द्यावा लागलेला राजीनामा हे देवेंद्र फडणवीसांच्या रणनीतीचे यश मानावे लागेल. या काळात त्यांना केंद्रात जाण्याचाही संधी आल्याचे बोलले जाते मात्र, राज्यातच माझी गरज आहे म्हणत ते राज्यातच थांबून आहेत. राज्याच्या जडणघडणीत जे काही योगदान देणे शक्य आहे, त्यासाठी ते कायम प्रयत्नशील राहिलेले आहेत.
या ५ टप्प्यांच्या वाटचालीत देवेंद्रजींनी सर्वप्रथम सर्वांशी मैत्र जपले आहे त्यामुळे सर्वच स्तरातून त्यांना सहकार्य मिळत राहिलेले आहे. विविध पदांवर काम करतांना त्यांना अनेकदा टीकेला सामोरे जावे लागले आहे, अश्यावेळी शांतपणे टीकाकारांना दुर्लक्षित करण्याचे कसब त्यांना साध्य झाले आहे. हाथी चले बाज़ारो, कुत्ते भोकतेहे हजारो हे तत्व त्यांनी आत्मसात केलेले आहे, त्यामुळे कधी शांततेत तर कधी आक्रमक होत त्यांची वाटचाल सुरु आहे. या वाटचालीवर ते यशस्वी राहतीलच हा त्यांच्यासह त्यांच्या सर्व चाहत्यांना विश्वास आहे. सर्वांशी मैत्र जपताना त्यांनी पक्षातील वरिष्ठांचाही चांगला विश्वास संपादन केला आहे त्यामुळे त्यांची पुढील वाटचाल उज्वलच राहील याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही.
देवेंद्रजींना केंद्रात जाण्याची संधी होती हे आधीच नमूद केले आहे. केंद्रातही उच्च पदावर जाऊन ते आपल्या कर्तृत्वाची ध्वजा फडकवतील याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही मात्र त्याआधी त्यांनी महाराष्ष्ट्रात पुन्हा एकदा भाजपची सरकार आणण्याचा प्रयत्न सुरु केला आहे, त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरु आहे.

देवेंद्रजींचे सर्व संकल्प पूर्ण होवोत हीच त्यांच्या ५१व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा.

ता.क. : घ्या समजून राजे हो या लेख मालिकेतील अविनाश पाठक यांचे लेख वाचण्यासाठी त्यांच्या www.facebook.com/BloggerAvinashPathak या फेसबुक पेजवर जाऊन वाचता येतील.

अविनाश पाठक

Leave a Reply