ओबीसी आरक्षणावरून भाजपाची दुटप्पी भूमिका स्पष्ट झाली – विजय वडेट्टीवार

नागपूर : २१ जुलै – अनुसूचित जाती-जमाती व्यतिरिक्त इतर जातींची जातीनिहाय जनगणना करता येणार नाही. हे केंद्र सरकारने स्पष्ट केल्यानंतर ओबीसी आरक्षणासाठी गळा काढणाऱ्या राज्यातील विरोधी पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे, अशी मागणी राज्याचे ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मात्र यामुळे भाजपाची दुटप्पी भूमिका स्पष्ट झाली, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
ओबीसींची जातीनिहाय गणना होणारच नसेल तर एम्पिरिकल डाटा येणार कुठून आणि ओबीसींचे मागासलेपण सिद्ध होणार कुठून, असा सवाल त्यांनी केला आहे. केंद्राने ओबीसींच्या जातीनिहाय गणनेला स्पष्ट नकार दिल्यानंतर राज्यातील भाजपा नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या कालच्या संसदेतील उत्तरानंतर ओबीसी आरक्षणाबद्दल केंद्र सरकार आणि भाजपाची दुटप्पी भूमिका स्पष्ट झाली आहे, असे आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.
ओडिशा आणि महाराष्ट्र राज्याच्या ओबीसीची जनगणना करण्याची मागणी केली होती, यावर केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी काल लोकसभेत एका लेखी प्रश्नाचे उत्तर देताना अनुसूचित जाती आणि जमातींच्या शिवाय इतर कोणत्याही जातींचा जनगणनेमध्ये समावेश करण्यात येणार नसल्याचे सांगितले होते. या संदर्भात सरकारने हा धोरणात्मक निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिल्यानंतर आता ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भाजाप नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

Leave a Reply