अमरावती : २१ जुलै – मोर्शी लगत असलेल्या माळू नदीच्या पुलावरून एका २५ वर्षीय युवकाने नदीपात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी १० वाजता उघडकीस आली.
प्राप्त माहितीनुसार, वरुड तालुक्यातील वाडेगाव येथील सागर जानराव सोनुले हा युवक बँकेत काम करीत असून तो ऑनलाईन गेममध्ये पैसे हरला असल्याचे समजते. पैसे हरल्यामुळे तो नेहमीच विवंचनेत राहत होता. १९ जुलै रोजी त्याने मोर्शी लगत असलेल्या माडू नदीच्या पात्रात रात्री ११ वाजताच्या सुमारास उडी घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती पोलिसांना प्राप्त होताच त्यांनी महसूल विभागाला याबाबतची माहिती दिली. क्षणाचाही विलंब न करता तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाशी संपर्क करून अमरावती जिल्हा येथील बचाव पथकाला पाचारण केले.
२० जुलै रोजी सागरचे नातेवाईक माडू नदीच्या पुलावर शोध घेण्यासाठी आले असता त्यांना सागरची दुचाकी गाडी व चपला आढळून आल्या. त्या अनुषंगाने मोर्शीचे तहसीलदार डॉ. सिद्धार्थ मोरे, पोलीस पथक व जिल्हा बचाव पथकाच्या वतीने शोध मोहीम राबविण्यात आली. मात्र सागरचा मृतदेह आढळून आला नाही. २१ जुलै रोजी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आल्यावर सागरचा मृतदेह माडू नदीच्या जुन्या पुलाच्या बाजूने वाहत्या पाण्याच्या दिशेने अंदाजे १०० मीटर परिसरात फुगलेल्या अवस्थेत आढळून आला. मोर्शी पोलिसांनी मृतक सागरचे प्रेत विच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालयात आणले.