ऑक्सिजन अभावी मरण पावलेल्या लोकांच्या नातलगांनी मोदी सरकारवर खटलाच दाखल करायला हवा – संजय राऊत

मुंबई : २१ जुलै – ‘करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी मरण पावलेल्या लोकांच्या नातलगांनी मोदी सरकारवर खटलाच दाखल करायला हवा,’ अशी संतप्त प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू झालेला नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल राज्यसभेत दिली. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या अहवालाचा आधार या माहितीला असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी सांगितलं. काँग्रेसच्या सदस्यांनी सरकारच्या या दाव्यावर जोरदार आक्षेप घेतला होता. ऑक्सिजनअभावी केवळ दिल्लीतच नव्हे तर देशातील प्रत्येक राज्यात करोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मात्र, आरोग्य राज्यमंत्री सभागृहाची दिशाभूल करत आहेत. त्यांच्या विरोधात हक्कभंगाचा ठराव आणण्याचा इशारा काँग्रेसचे खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी दिला होता. त्यानंतर आता इतर पक्षांनीही केंद्रावर टीकेची तोफ डागली आहे.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘ऑक्सिजन अभावी ज्यांचे नातेवाईक गेले, जे सिलिंडरसाठी इकडे तिकडे धावत होते का? त्यांचा सरकारच्या या दाव्यावर विश्वास बसतो का हे पाहावं लागेल. ऑक्सिजनअभावी अनेक राज्यांत मृत्यू झाले आहेत. अशा मृतांच्या नातेवाईकांनी केंद्र सरकारवर खटला दाखल केला पाहिजे,’ असं राऊत म्हणाले. ‘उत्तर लेखी असेल किंवा तोंडी असेल. सरकार सत्यापासून दूर पळतंय. हा कदाचित ‘पेगॅसस’चा परिणाम असेल, असा टोलाही राऊत यांनी हाणला आहे.

Leave a Reply