५५० कोविड कंत्राटी कर्मचारी कार्यमुक्त, पूर्ववत कामावर घेण्याची मागणी

बुलडाणा: २० जुलै- राज्य शासनाने कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर राज्यभरात डॉक्टर, स्टाफ नर्स, औषध निर्माता, भांडारपाल, सफाई कर्मचारी, क्ष-किरण तज्ञ, ईसिजी तंत्रज्ञ आदी पदांची कंत्राटी पध्दतीने भरती केलेली होती. या कर्मचार्‍यांनी कोरोनाच्या परिस्थीतीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र रुग्णसेवा केली. रुग्णसेवा करतांना अनेक कोरोना कर्मचार्‍यांवर हल्ले झाले. काही कोरोना कर्मचार्‍यांनी रूग्णसेवा करत असतांना आपले प्राणही गमावले आहेत. मात्र, बुलडाणा जिल्ह्यातील 738 पैकी 550 कंत्राटी कर्मचार्‍यांना आरोग्य प्रशासनाकडून कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यांना पुन्हा सेवेत सामावून घेण्याची मागणी कार्यमुक्त कोविड कंत्राटी कर्मचार्‍यांनी आज जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कोविडचा प्रार्दुभाव कमी झाल्यामुळे बंद करण्यात आलेले कोविड सेंटर व तेथील कमी करण्यात आलेले वैद्यकीय अधिकारी, परिचारीका, कक्षसेवक व सर्व पॅरामेडीकल स्टाफ यांना कार्यमुक्त न करता प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण किंवा शहरी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे इतरत्र सामावुन घेण्यात यावे तसेच आरोग्य विभागातील कंत्राटी पदावर काम करणार्‍या सर्व कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत कायमस्वरुपी सामावुन घ्या, अशा मागण्या कंत्राटी कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या.
यावेळी बुलडाणा जिल्हा कोविडं कंत्राटी आरोग्य कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष अमोलकुमार गवई, उपाध्यक्ष दयानंद गवई, महिला जिल्हाध्यक्षा दीपाली लहाने, जिल्हा संघटन प्रमुख शे.जहिर, जिल्हा सह संघटन प्रमुख संदीप भालेराव, पायल मोरे व सहकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Leave a Reply