सामनावर मी कोणती ही प्रतिक्रिया देत नाही कारण मी सामना वाचत नाही – नाना पटोले

नवी दिल्ली : २० जुलै – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राजधानी दिल्लीत आहेत. नाना पटोले आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांना भेटणार आहेत. यावेळी त्यांना ‘सामना’ दैनिकातून काँग्रेसच्या स्थितीबाबत केलेल्या भाष्यावर प्रतिक्रिया विचारण्यात आली. नाना पटोले म्हणाले, “सामनावर मी कोणती ही प्रतिक्रिया देत नाही कारण मी सामना वाचत नाही. कुणी काय टीका करावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण वारंवार त्याच त्याच गोष्टी सोबत राहून बोललं जातं असेल तर त्याचा विचार आम्हला एकदा करावा लागेल”
आम्हला त्यांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. गांधी परिवारावर टीका करण म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. जो थुंकेल त्याच्यावरच पडेल हे त्यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा नाना पटोलेंनी दिला.
काँग्रेस पक्षात डरपोक लोकांना स्थान नाही असे राहुल म्हणतात ते बरोबर आहे, पण पक्षामधून ‘डरपोक’ जात राहिले तरी काँग्रेस पक्ष हिंमतबाज कार्यकर्ते निर्माण करण्याची फॅक्टरी आहे काय? असा सवाल सामना दैनिकात करण्यात आला आहे. याशिवाय काँग्रेस पक्षाला नक्की काय करायचंय आणि दिशा कोणती याबाबत संभ्रम असल्याचं आजच्या सामना अग्रलेखात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, नाना पटोले आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटणार आहेत. काँग्रेस सरचिटणीस के सी वेणूगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील हे सुद्धा बैठकीला उपस्थित असतील. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी ही बैठक होत असून, या बैठकीत संघटनात्मक विषयांवर चर्चा होणार आहे. नाना पटोले यांच्या दोन बैठका आहेत. एक बैठक एआयसीसीला आहे नेत्यांबरोबर तर दुसरी बैठक राहुल गांधी यांच्याबरोबर आहे.

Leave a Reply