शेतात चिखलणी करताना ट्रॅक्टर पलटी झाल्याने चालकाचा जागीच मृत्यू

भंडारा : २० जुलै – धान रोवणीपुर्व शेतात चिखलणी करतांना फसलेला ट्रॅक्टर काढताना इंजिन पलटी झाल्याने त्याखाली दबून चालकाचा जागीच मृत्यू झाला. सदर दुर्दैवी घटना दुपारी 1 वाजताच्या सुमारास तालुक्यातील मडेघाट शेतशिवारात घडली. संदिप आनंदराव ढोरे (२८) रा.कन्हाळगाव असे मृतक ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे.
मडेघाट शेतशिवारातील महादेव राऊत नामक शेतक-याच्या शेतात धान रोवणीपुर्वी चिखलणी करण्याचे काम सुरू होते. स्वराज कंपनीचा नवीन विना क्रमांकाचा ट्रॅक्टर इंजिन चिखलणी सुरू असताना शेतात खोलजागेत फसला. यावेळी चालकाने ट्रॅक्टरच्या मागील चाकात लाकडी खांब टाकून फसलेला ट्रॅक्टर वर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र नियंत्रण सुटल्याने अचानक ट्रॅक्टर पलटली झाला. यात चालक संदीपचा ट्रॅक्टरखाली चिखलात दबून जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती जगदीश ढोरे व संदीप तुपटे यांना होताच त्यांनी लाखांदूर पोलिसांना माहिती दिली. पोलिस नाईक प्रदीप राऊत, बीट अंमलदार मनिष चव्हाण यांनी घटनास्थळी गाठले. प्रसंगी दुस-या ट्रॅक्टरच्या मदतीने व ग्रामस्थांच्या सहकार्याने मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार मनोहर कोरेटी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Leave a Reply