मुंबई:२० जुलै- मुंबई महापालिकेचे माजी आयुक्त, राज्याचे सेवानिवृत्त मुख्य सचिव आणि सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सल्लागार असलेल्या अजोय मेहता यांचा नरिमन पॉईंट येथील फ्लॅट चर्चेत आला आहे. मेहता यांनी मंत्रालयाजवळच्या जगन्नाथ भोसले मार्गावरील समता को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पाचव्या मजल्यावरचा फ्लॅट विकत घेतलेला आहे. हा फ्लॅट मेहता यांनी ५.३ कोटी रुपयांना विकत घेतला होता. बेनामी देवाणघेवाण झाल्याच्या मुद्दा या व्यवहारात समोर आला असून, हा फ्लॅट आयकर विभागाच्या रडारवर आला आहे. अजोय मेहता यांची महारेराच्या संचालकपदीही नियुक्ती करण्यात आलेली आहे.
दक्षिण मुंबईत एका संपत्ती व्यवहारात बोगस कंपनीची स्थापन करून बेनामी व्यवहार करण्यात आल्याचं आयकर विभागाच्या बेनामी संपत्ती शाखेला आढळून आलं. दक्षिण मुंबईतील फ्लॅट खरेदी व्यवहार एक बोगस कंपनी आणि सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यामध्ये झाला असल्याचं समोर आलं. १,०७६ चौरस मीटर या फ्लॅटचा कार्पेट एरिया आहे.ज्या कंपनीकडून फ्लॅट खरेदी करण्यात आला, त्या कंपनीचे दोन भागधारक असून, दोघेही मुंबईतील चाळीत राहतात अशी माहिती समोर आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, ही कंपनी फ्लॅट खरेदी व्यवहारासाठीच निर्माण करण्यात आलेली होती. अनामित्रा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. बेनामी व्यवहार विभागाला कंपनीच्या बॅलन्सशीटमध्ये अनेक विसंगती आहेत . कंपनीच्या भागधारकांनी कर भरणाच केला नसल्याचं दिसून आलं आहे.