नागपूर : २० जुलै – येत्या २३ जुलै पासून जपानमधील टोकियो येथे सुरू होणा-या ऑलिम्पिकमध्ये पंचाची भूमिका निभावण्यासाठी निवड झालेले नागपूरकर मंगेश मोपकर यांना महापौर दयाशंकर तिवारी यांनी शुभेच्छा दिल्या. मनपा मुख्यालयातील महापौर कक्षामध्ये मनपाचा मानाचा दुपट्टा, स्मृतिचिन्ह आणि तुळशीरोप देउन महापौरांनी मंगेश मोपकर यांचा सत्कार केला.
याप्रसंगी क्रीडा समिती सभापती प्रमोद तभाने, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, क्रीडा अधिकारी पीयूष आंबुलकर, राजेश मोपकर आदी उपस्थित होते.
आपल्या शहरातील व्यक्तीची ऑलिम्पिकमध्ये ‘अंम्पायर’ म्हणून निवड होणे ही प्रत्येक नागपूरकरासाठी अभिमानाची बाब आहे. मंगेश मोपकर यांच्या या निवडीचा अत्यंत आनंद असून त्यांच्या ऑलिम्पिकमधील अनुभवाचा पुढे आपल्या शहरातील खेळाडूंना मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त करून महापौर दयाशंकर तिवारी यांनी मंगेश मोपकर यांना त्यांच्या वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
मंगेश मोपकर हे २२ जुलै रोजी टोकियोला रवाना होणार आहेत. विशेष म्हणजे ऑलिम्पिकमध्ये टेबल टेनिस करिता भारतातून एकमेव पंच म्हणून त्यांची निवड झालेली आहे. ६० वर्षीय मंगेश मोपकर हे रामदासपेठ येथील रहिवासी असून त्यांनी बँक ऑफ इंडियाच्या व्यवस्थापक पदावरून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली आहे. गत ३० ते ४० वर्षापासून स्वत: टेबल टेनिस खेळाडू यासोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. त्यांचे वडील अविनाश मोपकर हे सुद्धा आंतरराष्ट्रीय पंच होते तर भाउ राजेश मोपकर सुद्धा आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक आहेत.
मंगेश मोपकर यांनी १९९२ मध्ये दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये पंच म्हणून काम पाहिले. १९९६ मध्ये इंग्लंडमध्ये घेण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पंच परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झाले असून इंदोर येथे झालेल्या ब्ल्यू बॅच अम्पायरच्या परीक्षेत सुद्धा त्यांनी यश संपादित केले आहे. यापूर्वी त्यांनी चीन, हाँगकाँग, इंग्लंड, कोरीया, तायवान, जपान या देशात झालेल्या टेबल टेनिस स्पर्धेमध्ये पंचाची भूमिका निभावली आहे. त्यांच्या ऑलिम्पिकमधील निवडीबद्दल संपूर्ण नागपूर शहराच्या वतीने महापौर दयाशंकर तिवारी यांनी त्यांचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या आहेत.