पोलीस मारहाणीत मृत्यू झालेल्या मनोज ठवकरच्या कुटुंबीयांची बच्चू कडू यांनी घेतली भेट

नागपूर : २० जुलै – नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झालेल्या मनोज ठवकरच्या कुटुंबियांची आज राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी भेट दिली. बच्चू कडू हे मनोज ठवकरच्या नागपुरातील घरी गेले होते. यावेळी त्यांनी मनोजच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच दोषींवर सरकारकडून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन कडू यांनी मनोजच्या कुरुंबियांना दिले.
सात जुलैच्या रात्री नागपूर शहरातील पारडी पोलीस स्टेशन हद्दीत पोलिसांच्या मारहाणीत दिव्यांग मनोज ठवकरचा मृत्यू झाला होता. या घटनेवर संपूर्ण नागपूर जिल्ह्यात प्रतिक्रिया उमटली आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. मास्क लावला नाही आणि हेल्मेट घातले नाही या कारणामुळे झालेल्या वादातून पोलिसांनी मनोजला मारहाण केली होती. त्या मारहाणीत मनोज ठवकरचा मृत्यू झाला. या घटनेनंतर मनोज ठवकर राहत असलेल्या पारडी परिसरात पोलिसांविरोधात जनतेचा मोठा रोष दिसून आला होता.
काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते, भाजप नेते देवेंद्र फडणवीस तसेच नागपूरचे खासदार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीदेखील मनोजच्या कुरुंबीयांची भेट घेतली होती. त्यांच्यानंतर आज शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू हे महाराष्ट्र सरकारच्या वतीने ठवकर कुटुंबियांना भेटले आणि त्यांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे तसेच दोषी असल्यावर पोलिसांविरोधात कठोर कारवाईचे आश्वासनही दिले.
३५ वर्षीय मनोज ठवकर हा दिव्यांग होता. मेकॅनिक म्हणून तो नागपुरात काम करत होता. नागपूर शहरातील पारडी चौक हनुमान मंदिर परिसरात ७ जुलैच्या रात्री पोलिसांची नाकाबंदी सुरु होती. रात्री साडेआठ-नऊ वाजताच्या सुमारास मनोज या मार्गाने घरी चालला होता. यादरम्यान पोलिसांनी मनोजची दुचाकीही थांबवली, मात्र वेळीच ब्रेक न लागल्याने त्याची दुचाकी पोलीस वाहनावर धडकली. त्यानंतर वाद झाला आणि पोलिसांनी मनोजला मारहाण केल्याचा आरोप आहे.
मनोजने त्याच्या दुचाकीने मुद्दाम पोलिसांच्या वाहनावर धडक मारल्याचा पोलिसांचा समज झाला, असा दावा केला जातो. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे यांच्यासह तिघा पोलीस कर्मचाऱ्यांनी मनोज ठवकरला मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्याला पोलीस स्टेशनमध्येही नेण्यात आले. मात्र शुद्ध हरपलेल्या मनोज ठवकरला नागपुरातील भवानी मल्टिस्पेशालिटी अँड रिसर्च सेंटरमध्ये दाखल करण्याआधीच मृत घोषित करण्यात आले होते.

Leave a Reply