ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुण व तरुणी ठार

नागपूर : २० जुलै – जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील कामठी शहरातील जयस्तंभ चौकात दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने तरुण-तरुणी ठार झाल्याची घटना दुपारी १ वाजतादरम्यान घडली. जुनी कामठी पोलिसांनी ट्रकचालकाला अटक केली आहे.
जुनी कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव सुरेश शंभरकर (रा. काशीनगर, रामेश्वरी रिंग रोड, नागपूर) याने दुचाकी क्रमांक एम. एच. ४९ / डब्ल्यू. ६५६८ वर इंटरनेशिया इंडिया मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड, रनाळा, तालुका कामठी येथे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणारी मोहिनी कृष्णबिहारी तिवारी (वय २0, रा. मोतीबाग रेल्वे क्वार्टर, नागपूर) हिला घेऊन रनाळ्यावरून जयस्तंभ चौकमार्गे कन्हानकडे जात असताना मागच्या दिशेने कामठीवरून मौद्याकडे जाणारा ट्रकचालक मालक सोनू माणिक सहारे (वय २६, रा. न्यू. येरखेडा, हनुमान मंदिराजवळ, कामठी) याने ट्रक क्रमांक एम. एच. ४0 / बी. एल. ७४४४ ने जयस्तंभ चौकात धडक दिल्याने दुचाकीवरील वैभव व मोहिनी यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने गंभीर जखमी अवस्थेत नागरिकांनी कामठी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असता डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. घटनेची माहिती जुनी कामठी पोलिसांना मिळाली असता ठाणेदार राहुल शिरे, पोलिस उपनिरीक्षक कल्पना कटारे, हेडकॉन्स्टेबल दिलीप ढगे घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून ट्रकचालकाविरोधात जुनी कामठी पोलिस स्टेशनला कलम २७९, ३0४ (अ) भादंविनुसार गुन्हा दाखल करून अटक केली. अपघाताची माहिती दोन्ही तरुण-तरुणीच्या कुटुंबाला दिली असता दोघांचेही नातेवाईक उपजिल्हा रुग्णालयात आले होते. शवविच्छेदनानंतर दोघांचेही मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. घटनेचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कल्पना कटरे करीत आहे.

Leave a Reply