आपल्या देशात सध्या लोकशाही आहे की, अजूनही सरंजामशाही सुरू आहे, असा प्रश्न सामान्य माणसाला अनेकदा पडतो, तसाच सध्या महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाला पडतो आहे. त्याला कारण झाली काल नाशिकमध्ये घडलेली एक घटना! महाराष्ट्राचे गृहनिर्माण मंत्री जीतेंद्र आव्हाड काल नाशकात होते. एरवी आव्हाड हे निधार्मिकतावादाचा पुरस्कार करणारे आहेत, मात्र, काल त्यांचे हिंदू धर्मावरील प्रेम अचानक उफाळून आले. त्यांना नाशिकमध्ये असलेल्या नवशा गणपतीचे दर्शन घेण्याची अनिवार इच्छा झाली. आता, या गणपतीला कोणता नवस करायचा होता, ते स्वत: आव्हाड किंवा नवशा गणपतीच जाणो!
सध्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातील सर्व मंदिरे बंद आहेत. कोरोनाच्या संकटामुळे लागोपाठ दुसर्या वर्षी पंढरपूरची आषाढी एकादशीची वारीही रद्द करण्यात आली आहे. त्याला महाराष्ट्रातील वारकर्यांचा प्रचंड विरोध आहे. हा विरोध झुगारुन वारी पंढरपुरात येऊ नये, म्हणून पंढरपुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. इतकेच काय, तर, ईदेचा नमाजसुद्धा मुस्लिम बांधवांनी घरूनच पढावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे सामान्य भाविक गेल्या अनेक दिवसांपासून मंदिरात जाणे विसरुन गेला आहे. गेला तरी, बाहेरुनच कुलूपबंद असलेल्या देवाचे दर्शन घेतो आणि परमेश्वरा! या संकटातून बाहेर काढ, अशी विनवणी करून घरी परत येतो.
राज्य सरकारने मधल्या काळात दारुची दुकाने उघडी केली, हॉटेलला परवानगी दिली, राजकीय पक्षांचे मेळावे होतातच. मग, मंदिरांनाच विरोध कां? असा सामान्य नागरिकांचा सवाल आहे. सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी विश्व हिंदू परिषदेने राज्यभर भजन आंदोलनही केले होते, मात्र, राज्य सरकारला जाग आलेली नाही.
सरकारचा निर्णय चूक असो किंवा बरोबर, एकदा निर्णय घेतल्यावर त्याची अम्मलबजावणी होणे, अपेक्षित असते. त्यातही सरकारने निर्णय घेतल्यावर सरकारमधल्या मंत्र्यांनी तरी, किमान तो पाळला पाहिजे, अशी सर्वसाधारण व्यक्तींची अपेक्षा असते, मात्र, आपल्याकडे मंत्री आणि राजकीय नेत्यांना आम्ही कोणीतरी विशेष आहोत, आणि कायदे आमच्यासाठी नाहीतच, असे कायम वाटत असते. परिणामी, असलेले कायदे मोडण्यातच आम्हाला मोठेपणा वाटतो. तसाच प्रकार आव्हाडांनी केला. एक शिस्तप्रिय नागरीक म्हणून ते नवशा गणपतीच्या दाराशी उभे राहून दर्शन घेऊन येऊ शकले असते, मात्र, तसे करण्यासाठी ते काय सामान्य नागरीक होते काय? मी मंत्री आहे आणि माझ्यासाठी दरवाजे उघडलेच पाहिजेत, असा हट्ट त्यांनी धरला असावा. त्यामुळे मंदिर प्रशासनाने आव्हाडांसाठी मंदिराचे दरवाजे उघडले. मग, आव्हाडांनी थेट गाभार्यात जात रीतसर गणपतीची पूजा केली. नंतर आरतीही केली. यावेळी गाभार्यात एकटे आव्हाडच गेलेत, असे नाही, तर त्यांचे कर्मचारी तर होतेच, आणि शिवाय कार्यकर्तेही मोठ्या संख्येत मंदिरात घुसले होते. यावेळी सोशल डिस्टंसिंगचा पार फज्जा उडाला होता.
एरवी, आम्ही पाचपेक्षा अधिक व्यक्ती रस्त्यावर एकत्र आलो तर, पोलिस आम्हाला पकडून दंड करतात. कारमध्ये चार व्यक्तींना बसणे शक्य असतानाही दोनच व्यक्ती बसवा, असा आग्रह धरून सामान्य माणसाला वेठीला धरतात. इथे आव्हाडांनी देवपूजा करताना कोरोनाचे नियम दिवसाढवळ्या पायदळी तुडवले. अशावेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार काय? असा सवाल विरोधकांनी केला आहे.
अर्थात, असा गुन्हा दाखल केला जाणार नाही. आव्हाडांवर कोणतीही कारवाई होणार नाही, हे निश्चित आहे, कारण, या देशात लोकशाही आहे ती कागदोपत्री. बाकी अजूनही आम्ही संरजामशाहीतच वावरतो आहोत, हेच आजचे कटू वास्तव आहे.
अविनाश पाठक
९०९६०५०५८१