पंतप्रधान मोदींच्या भाषणादरम्यान लोकसभेत विरोधकांचा गोंधळ

नवी दिल्ली: १९ जुलै- संसदेच्या पावसाळी अधिवेशनास सुरुवात झाली असून, आज सोमवारी पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणादरम्यान विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नव्या मंत्र्यांची ओळख करुन देण्यासाठी उभे राहिले होते. विरोधकांकडून यावेळी गदारोळ घातला गेला. इतक्या महिला, दलित आणि आदिवासींना मंत्री बनवण्यात आल्यानंतर संसदेत उत्साह असेल असं मला वाटलं होतं, असा टोला यावेळी मोदींनी लगावला.
यावेळी कृषी, ग्रामीण, ओबीसी समाजातील सहकाऱ्यांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आलं आहे. पण, काही लोक महिला, ओबीसी आणि शेतकऱ्यांच्या मुलांना मंत्री होण्याची संधी दिल्याने आनंदी नाहीत. यामुळे त्यांची ओळख करुन देण्याची परवानगी ते देत नाहीत, असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर जोरदार टीका केली.
विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हे संसदेच्या परंपरेला धरुन नसल्याचं सांगत संताप व्यक्त केला. चांगल्या पंरपरा तोडल्या जात आहेत. सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशाच्या संसदेत हे वागणं योग्य नाही असं त्यांनी विरोधकांना सुनावलं.

Leave a Reply