मुंबई:१९ जुलै- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अनिल देशमुख हे ‘नॉट रिचेबल’ असल्याची माहिती समोर आली आहे. अटकेच्या भीतीने देशमुख गायब झाले असल्याचं बोललं जात असून, ईडीकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी परमबीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप करत खळबळ उडवून दिली होती. १०० कोटींचं प्रकरण चर्चेत आल्यानंतर ईडीने भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तपास सुरू केला. त्यामुळे मागील काही महिन्यांपासून माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीच्या रडावर असून, देशमुख यांच्या मालमत्तांची झाडाझडतीही ईडीकडून केली जात आहे. त्याचबरोबर भ्रष्टाचाराच्या प्रकरणात ईडीने देशमुख यांची ४ कोटींची मालमत्ता जप्त केली असून, रविवारीही त्यांच्या काटोल येथील निवासस्थानी छापे टाकले.
अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार मालकांकडून वसुली करण्याचं टार्गेट पोलिसांना दिलं होतं, असा आरोप माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला होता. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनीही एनआयए न्यायालयाला लिहिलेल्या पत्रात हा आरोप केला होता. त्यानंतर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ईडीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली. या प्रकरणाचा सीबीआयकडूनही तपास केला जात आहे. दरम्यान, आता देशमुख यांचा फोन लागत नसल्याची माहिती समोर आली आहे.