नवी दिल्ली: १८ जुलै- संसदेच्या पावसाळी अधिवेशनातं २३ विधेयकं पारित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. १७ नवी विधेयकं आहेत. दरम्यान आज संध्याकाळी ६ वाजता सोनिया गांधींनी काँग्रेस खासदारांची वर्च्युअल बैठक बोलावली आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी सत्ताधारी आणि विरोधीपक्षांच्या जोर बैठका सुरु आहेत. त्यामुळे उद्यापासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशन आक्रमक पवित्रा पाहायला मिळेल, असं दिसतंय.
विरोधक भाजपा सरकारला इंधन दरवाढ, कोविडवरील उपाययोजना आणि लस तुटवडा, परराष्ट्र धोरण, राफेल करार या सारख्या मुद्द्यांवर घेरण्याची रणनिती आखत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रणनितीत फेरबदल केला आहे. सोनिया गांधी यांनी दोन्ही सभागृहात कामकाज करण्यासाठी दोन गट तयार केले आहेत. या गटाच्या माध्यमातून रणनिती आखली जाणार आहे.
संसदेच्या अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक बोलवण्याची परंपरा आहे. यासाठी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही उपस्थिती होती. सर्वपक्षीय बैठकीत ३३ पक्षांनी सहभाग घेतला त्यात ४० हून अधिक नेत्यांचा सहभाग होता. सरकारकडून विरोधकांचे मुद्दे जाणून घेण्यात आले.