विश्रांतीला थांबलेल्या ड्रायव्हर-कंडक्टरची बॅग युनिफॉर्मसकट चोरी, एका तासात चोर जेरबंद

यवतमाळ : १८ जुलै – बस स्थानकावर विश्रांतीला थांबलेल्या ड्रायव्हर-कंडक्टरची बॅग युनिफॉर्मसह चोरीला गेली. यवतमाळमध्ये घाटंजी बस स्थानकावर हा प्रकार घडला. चोर सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाल्यामुळे पोलिसांनी केवळ एका तासात त्याला जेरबंद केले.
घाटंजी बस स्थानकावर यवतमाळ डेपोची बस क्रमांक एमएच ०७-९४३७ रात्री थांबली होती. हॉल्ट असल्यामुळे ड्रायव्हर-कंडक्टर कुमरे आणि सीडाम बस स्थानकाच्या रुममध्ये रात्री विश्रांती घेत थांबले होते. त्यावेळी रात्री जवळपास दीड वाजताच्या सुमारास एका चोरट्याने चक्क चालक-वाहकाती बॅग, खाकी वर्दी आणि तिकीट फाडण्याची मशिन चोरून नेली.
कपड्यातील पैशांचे पाकीट, त्यामध्ये असलेली महत्त्वाची कागदपत्रे पाकिटातून काढून फक्त ९०० रुपये रोख रक्कम लंपास करुन बस स्थानकाच्या बाहेर मशीन आणि कपडे फेकून दिले होते. ही घटना सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाली.
फुटेजमध्ये पाठमोरा दिसणारा चोरटा हा गजानन हिरालाल राठोड (रा. शिवपुरी तालुका कळम) असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर घाटंजी पोलिसांनी त्याला केवळ एका तासात जेरबंद करुन गजाआड केले आहे.

Leave a Reply