वर्धा : १८ जुलै – बजाज फायनान्स कंपनीचे पैसे भरण्यासाठी दिलेला धनादेश अनादर झाल्यामुळे त्यासाठी लागणारी पेनाल्टी भरण्यास तयार असताना ही वसुली एजंट वारंवार त्यांच्या घरी येऊन मानसिक त्रास देत असल्याने सेलू प्रभाग क्रमांक ११ येथील रहिवासी किसना शामराव देवतळे (५0) या इसमाने महाबळा केळझर नजिकच्या दफ्तरी पेट्रोल पंपावरील टायर पंचरच्या दुकानाजवळील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सकाळी उघडकीस आली.
किसना हा स्थानिक दफ्तरी एग्रो प्रा.लिमिटेड कंपनीत इलेक्ट्रिशियनचे काम करीत होता. त्याने काही कामानिमित्त बजाज फायनान्स कंपनीकडून कर्ज उचलले होते. त्यासाठी तो नेहमीच विवंचनेत असायचा. तो मागील दोन दिवसापासून कामावर न जाता बेपत्ताच होता. घरच्यांनी त्याचा शोध घेतला. परंतु तो कुठेही आढळून न आल्याने शुक्रवार १६ जुलैचे रात्री कुटुंबियांकडून याबाबत सेलू पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. आज त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्याने चांगलीच खळबळ उडाली. मृतकजवळ पत्नी मनीषा, मोहित व मुलीच्या नावाने मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये बजाज फायनान्स कंपनीचे वसुली एजंट अतूल बालपांडे व करण पाठक यांचेकडून वारंवार होत असलेल्या मानसिक त्रासामुळे आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे. मी सर्वांचे दीड पट पैसे दिले असून आता कुणालाही पैसे देऊ नये असे पत्नीला सांगितले. माझ्यामुळे तुला फार त्रास झाला, आता त्या पैशात मुलीची बी.ई.ची एडमिशन करुन घेणे असा उल्लेख आहे.
घटनेचा पंचनामा सेलू पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुनील गाढे यांचे मार्गदर्शनात रत्नाकर कोकाटे, अमोल राऊत व गजानन वाट यांनी केला व मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठविण्यात आला. पुढील तपास सुरू असून तपासाअंती काय तो उलगडा होईल.