नवी दिल्ली: १८ जुलै- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी तासभर चर्चा केली. त्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. आता या भेटीवर शरद पवार यांनी ट्विट करून खुलासा केला आहे. पंतप्रधानांशी माझी भेट झाली. या भेटीत राष्ट्रीय हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, असे पवारांनी स्पष्ट केले. पवारांनी या ट्विटसोबत पंतप्रधानांना देण्यात आलेलं एक पत्रंही पोस्ट केले आहे.
बँकिंग रेग्युलेटरी अँक्टमध्ये बदल करण्यात आला असून, तो सहकारी बँकांसाठी धोकादायक आहे. याबाबत शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चाही केली होती. मात्र या विषयावर भेटून चर्चा करू असे नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानंतर प्रत्यक्ष भेट घेऊन या विषयावर अधिक चर्चा झाली, अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली.
दरम्यान, ईडीने राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख आणि एकनाथ खडसे यांची चौकशी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आलं होतं. त्याआधी पवार आणि केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांची भेट झाली होती. यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.