मुंबई :१८ जुलै- मुसळधार पावसामुळे मुंबईत हार्बर आणि मध्य रेल्वे सेवा पूर्णपणे ठप्प झाल्यामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पश्चिम, मध्य, हार्बर आणि ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूकीला फटका बसला आहे. लोकल सेवा थांबवण्यात आली. मध्य आणि पश्चिम रेल्वेच्यावतीने याची माहिती दिली असून, लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांनाही याचा फटका बसला आहे.सीएसएमटीकडे येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई आणि राज्यातील विविध शहरादरम्यान धावणाऱ्या तसेच परराज्यातून येणाऱ्या गाड्या वेगवेगळ्या स्थानकांपर्यंतच धावणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेनं येणाऱ्या या गाड्या आता दादर, मनमाड, पुणे, कल्याण, इगतपुरी, देवळाली, दिवा आदी रेल्वे स्थानकांपर्यंत येणार आहेत.मध्य रेल्वेने मुंबईत येणाऱ्या ट्रेन रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे ऐनवेळी हाल झाले आहेत.हार्बर मार्गावरील अनेक स्थानकांमध्ये पाणी जमा झालं आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक अद्यापही विस्कळीत आहे. सीएसएमटी ते ठाणे आणि सीएसएमटी – वाशी या दरम्यान लोकल गाड्या सुरू नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. सायन रेल्वे स्थानक परिसरामध्येही रेल्वे ट्रॅक पाण्याखाली आहे.
दरम्यान, हवामान खात्यानेही दिवसभर मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यासोबतच समुद्रात उच्च समुद्राची भरती येणार असल्याचाही इशारा देण्यात आला आहे.