नागपूर : १८ जुलै – पिस्तूलमधून गोळी सुटून ती थेट पोलिस कर्मचाऱ्याच्या मांडीत घुसली. ही थरारक घटना सकाळी ११ वाजताच्या सुमारास बेलतरोडी पोलिस स्टेशनसमोर घडली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून, जखमी पोलिसाला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
शेषकुमार इंगळे (वय ३५) असे जखमी पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते बेलतरोडी पोलिस स्टेशनमधील चेतक मोबाइलवर तैनात आहेत. यापूर्वी ते गडचिरोलीतील सी-६० पथकात तैनात होते. त्यामुळे त्यांना सर्वच अग्निशस्त्रांचे ज्ञान आहे. व्यंकटेश गंथाळे हे बीट मार्शल असून त्यांना पिस्तूल देण्यात आली आहे. काही दिवसांपासून व्यंकटेश यांच्याकडील पिस्तूल सतत ‘लॉक’ व्हायची. शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास इंगळे व व्यकंटेश हे दोघेही पोलिस स्टेशनसमोरील चहाटपरीवर चहा पित होते. यादरम्यान पिस्तूल सतत लॉक होत असल्याचे व्यंकटेश यांनी इंगळे यांना सांगितले. इंगळे यांनी पिस्तूल उघडून ती साफ केली. दरम्यान, पिस्तूलमध्ये एक गोळी राहिली. इंगळे यांनी पिस्तूल मांडीवर ठेऊन घोडा दाबला. गोळी थेट त्यांच्या मांडीत घुसली. गोळीबाराच्या आवाजाने पोलिस स्टेशनमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. ते बाहेर आले. इंगळे यांच्या मांडीतून रक्तस्राव होताना पोलिसांना दिसला. एका कर्मचाऱ्याने लगेच रुमाल बांधून रक्तस्राव थांबविण्याचा प्रयत्न केला. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय आकोत यांनी तत्काळ इंगळे यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेशकुमार, अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप झळके, उपायुक्त अक्षय शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हॉस्पिटल गाठून इंगळे यांच्या प्रकृतीची चौकशी केली. याप्रकरणाची नोंद घेत बेलतरोडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.