मुंबई: १८ जुलै- राज्यात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यापासून शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगताना सातत्याने दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून या वादाची धार चांगलीच वाढली आहे. आज रविवारी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. सर्वोच्च ज्ञानी आणि सोनिया सेनेचे प्रमुख संजय राऊत यांनी आपल्या प्रात:कालीन सवयीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देशातील इतर बड्या नेत्यांना पुरवली जाणारी सुरक्षा अनाठायी असल्याचा जावईशोध लावला आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. आपल्या ट्विटर अकाउंटवरून त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला असून त्यातून शिवसेनेवर आणि संजय राऊतांवर टीका केली आहे.
अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर मोदी परखड भूमिका घेत असतात. अशा वेळी त्यांची सुरक्षा हा राष्ट्रीय विषय आहे. पण हा विषय खूप मोठा आहे. त्यामुळे तुम्हाला तो कितपत कळेल, माहिती नाही. तरी आपल्या वाटत असेल की हा खर्च अनाठायी आहे, तर याची सुरुवात आपण आपल्या घरापासून केली तर काय हरकत आहे? राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फारसे बाहेर जात नाहीत. एक तर ते वर्षावर असतात किंवा मातोश्रीवर असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा फारसा काही प्रश्न उद्भवत नाही. त्यामुळे त्यांची सुरक्षा काढून आपण आपल्या घरातून एक आदर्श करून देऊ शकतो, असा उपरोधिक सल्लादेखील चित्रा वाघ यांनी दिला आहे.