नागपूर : १८ जुलै – अनिल देशमुख यांचे दिवाणजी (शेतीचे व्यवहार बघणारे) पंकज देशमुख यांना ईडीच्या पथकाने चौकशी करिता नरखेड तालुक्यातील वडविहार येथून काटोल येथे आणले होते. चौकशीनंतर पंकजला सोडून दिले आहे. ईडीच्या पथकाला अनिल देशमुख यांच्या काटोल आणि वडविहार या गावातील वाड्यात काहीही मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. ईडीच्या पथकाने सुमारे सहा तास काटोल येथील निवासस्थानी सर्च केला. यावेळी अनेक वर्षे जुन्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली आहे. केवळ देशमुख कुटुंबियांना त्रास देण्यासाठीच ईडी चौकशीचा फास आवळत असल्याचा आरोप देशमुख यांचे निकटवर्तीय आनंद देशमुख यांनी केला आहे.
सकाळी पाचच्या सुमारास ईडीचे एक पथक अनिल देशमुख यांच्या काटोल येथील वडिलोपार्जित घरी दाखल झाले होते. तर दुसरे पथक नरखेड तालुक्यातील वडविहार या गावी गेले. काटोल निवासस्थानी कोणीही उपलब्ध नसल्यामुळे ईडी पथकाने वडविहार येथे शेतीचे काम बघणारे दिवाणजी पंकज देशमुख यांना काटोल येथे आणण्यात आले. पंकजच्या उपस्थितीतच काटोल येथील घराची झाडाझडती घेण्यात आली. यावेळी प्रत्येक खोलीची ईडीच्या पथकाने तपासणी केली.
ईडीच्या पथकात आठ अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यापैकी चार अधिकाऱ्यांचे एक पथक वडविहार येथे गेले होते. तेथे सुमारे अर्धातास थांबल्यानंतर पंकज देशमुखला घेऊन ते पथक काटोल येथे परत आले आणि त्यानंतर काटोल येथील घराचा सर्च करण्यात आला. मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नसल्याची माहिती पंकज देशमुख यांनी दिली आहे.
ईडीच्या पथकाने अनिल देशमुख यांच्या काटोल येथील निवास्थानी सर्च करताना सुमारे १५ ते २० वर्ष जुने कागदपत्रांची मागणी गेली, मात्र या ठिकाणी कोणतेही कागदपत्र उपलब्ध नसल्याने ईडीच्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले, असा दावा पंकज देशमुख यांनी केला आहे.