अंत्यसंस्कार सुरु असतानाच कोसळला स्मशानभूमीच्या शेडचा स्लॅब

यवतमाळ : १८ जुलै – यवतमाळमध्ये अंत्यसंस्काराच्यावेळी एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. एका महिलेचे स्मशानभूमीत शव जळत असतांना स्मशानभूमीतील शेडचा स्लॅब कोसळल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना पुसद तालुक्यातील निंबी येथे घडली असून, यात सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली आहे. मात्र, गावकऱ्यांनी रोष व्यक्त करीत मृताच्या टाळू वरील लोणी खाणार्या ग्रामपंचायतीवर गटविकास अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
पुसद तालुक्यातील निंबी येथील ६५ वर्षीय वृध्द महिला रूखमाबाई हराळ यांचे दीर्घ आजाराने दि. १७ जुलै सकाळी ११ वाजता निधन झाले होते. रुक्माबाईचे निधन झाल्यानंतर त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम नातेवाईकाच्या साक्षीने सायंकाळी उरकण्याचे ठरले होते. रुखमाबाई यांचे नातेवाइकांनी निंबी येथील ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये बांधलेल्या स्मशानभूमीत अंत्य विधीचा कार्यक्रम उरकला.
यावेळी मुखाग्नी दिल्याच्या १५ मिनिटानंतर अचानक ग्रामपंचायतीने बांधलेले स्मशानभुमीचे सिमेंट काँक्रीटचे शेड कोसळल्याने सर्वांचीच भंबेरी उडाली. यावेळी गावकऱ्यांनी तातडीने त्या ठिकाणाहून धाव घेतल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी सुदैवाने झाली नाही.
ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये बांधलेल्या लाखो रूपयांचा स्लॅब हा भ्रष्टाचार करून निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्याचा ग्रामस्थाकडून आता आरोप केला जात आहे. काही महिन्यांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून बांधलेले सिमेंट काँक्रीटचे शेड अचानक कसे काय कोसळू शकते असा प्रश्न ग्रामस्थांच्या मनात उपस्थित होत आहे. बांधकाम झालेल्या शेडची ऑडिट करून ग्रामपंचायतीचे सचिव, सरपंचासह जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply