नाशिकः १७ जुलै-महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मनसेच्या गोटात मोठ्या हालचालींना सुरुवात झाली आहे. मनसेचे नेते व राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेंकडे मनसेच्या विद्यार्थी सेनेचं अध्यक्षपद देण्याची चर्चा सुरू असतानाच नाशिकची जबाबदारीही अमित ठाकरेंवर देण्याची मागणी होत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून तीन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आहेत. राज ठाकरे यांच्यापाठोपाठ अमित ठाकरेही आज नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत संदीप देशपांडेदेखील आहेत. त्यामुळं राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या बैठकीत मनसे विद्यार्थी सेनेचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं उपस्थित झाले आहेत.
आज शनिवारी राज ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत पक्षांतील प्रमुख नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक पार पडणार आहे. आजच्या या बेठकीसाठी मुंबईतील मनसेचे काही प्रमुख नेतेसुद्धा नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. अमित ठाकरेसुद्धा या पहिल्यांदाच या बैठकीला उपस्थित राहत आहेत. त्यामुळं मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे.