बल्लारपूर आणि चंद्रपूरचा समावेश ब्रॉडगेज मेट्रोमध्ये करा – मुनगंटीवार यांची गडकरींकडे मागणी

चंद्रपूर: १७ जुलै- केंद्रीय भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतील ड्रीम प्रोजेक्ट असलेलं ब्रॉडगेज मेट्रो प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे. या प्रकल्पात विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वडसा, गोंदिया आदी शहरांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. परंतु औद्योगिकदृष्टया महत्वाच्या असलेल्या बल्लारपूर आणि चंद्रपूर या शहरांचा समावेश या प्रकल्पात करण्यात आलेला नाही. त्यामुळे या प्रकल्पात बल्लारपूर आणि चंद्रपूर या शहरांचा समावेश करावा अशी मागणी माजी अर्थमंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
बल्लारपूर आणि चंद्रपूर या शहरांचा समावेश या प्रस्तावित प्रकल्पामध्ये करण्याचे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले. बल्लारपूर हे महाराष्ट्रातील प्रमुख रेल्वे जंक्शन आहे. भारताच्या विभीन्न भागातून महत्वपूर्ण रेल्वे बल्लारपूर व चंद्रपूर या शहरातून ये-जा करतात. बल्लारपूर आणि चंद्रपूर येथील दोन्ही रेल्वे स्थानके रेल्वे विभागाच्या सर्वोत्तम रेल्वे स्थानकांच्या स्पर्धेत देशात अव्वल ठरली आहेत. या दोन्ही शहरांचा समावेश या प्रकल्पात झाल्यास या परिसराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. दरम्यान, नागपूर ते छिंदवाडा यासह सात रेल्वे मार्गांवर ब्रॉडगेज मेट्रो १४० किमी प्रतितास वेगाने धावेल.

Leave a Reply