पवार मोदींना भेटायला गेले म्हणजे हवापाण्याच्या गोष्टी करणार नाहीत, राजकीय चर्चा तर होणारच – प्रवीण दरेकर

मुंबई : १७ जुलै – येत्या सोमवारपासून लोकसभेचं अधिवेशन सुरू होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असावी, असं सांगतानाच पवार मोदींना भेटायला गेले म्हणजे नुसत्या हवापाण्याच्या गोष्टी करणार नाहीत. राजकीय चर्चा तर होणारच, असं सूचक विधान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. त्यामुळे पवार-मोदी आणि पवार-देवेंद्र फडणवीस भेटीवर तर्कवितर्क वर्तवण्यात येत आहेत.
प्रवीण दरेकर यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांची भेट झाली की नाही मला माहीत नाही. कल्पना नाही. त्यामुळे माहीत नसलेल्या गोष्टीवर भाष्य करणं योग्य होणार नाही. शरद पवार हे मोठे नेते आहेत. त्यामुळे ते मोदींना भेटणं स्वाभाविक आहे, असं सांगतानाच महाराष्ट्रातील तीन पक्षाचं तीन दिशेला तोंड आहे. त्यामुळे पवार व्यथितही असतील. महाराष्ट्राचा विकास पुढे जात नाही या कल्पनेमुळे ते व्यथित असतील. अशावेळी मोदींसोबत चर्चा करावी असं त्यांना वाटलं असेल. राजकीय पक्ष कोणताही असला तरी आपल्या राज्याचा विकास करणं हाच प्रत्येक पक्षाचा अंतिम ध्यास असतो. पण पवार मोदींना भेटायला गेले म्हणजे ते नुसत्या हवापाण्याच्या गोष्टी करणार नाहीत. राजकीय चर्चा तर होणारच, असं दरेकर म्हणाले.
शरद पवारांचं व्यक्तिमत्व वादातीत असू शकतं. पण त्यांचं राजकारण विकासाभोवती फिरतंय हे विरोधक असलो तरी आम्ही मान्य करतो. पवार मोठे नेते आहेत. महाराष्ट्रातील विकासाचे प्रश्न, राजकीय अस्थिरता, गुंतागुंतीचे विषय आणि अडचणीचे विषय आहेत त्यावर चर्चा करण्यासाठी ते गेले असतील. एखाद्या विषयावर अंतिम उपाय हा मोदींकडेच मिळू शकतो, असं पवारांना वाटलं असेल. शिवाय या भेटीला अधिवेशनाची पार्श्वभूमीही आहे, असं त्यांनी सांगितलं.

Leave a Reply