मुंबई : १७ जुलै – आपल्या खासगी प्रवासासाठी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी चार्टर प्लेनचा वापर केला. मात्र या प्रवासाचा खर्च वीज कंपन्यांना भरायला लावल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक यांनी केला होता. यासंबंधी विश्वास पाठक यांनी कोर्टातही तक्रार याचिका दाखल केली होती. यावर आता मुंबई उच्च न्यायालयाने ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले आहे.
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सरकारी पैशाची उधळपट्टी केली असल्याचे सांगत, मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. याआधी वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यात आपण केलेल्या तक्रारीची दखल न घेतली गेल्याने आपण मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली असल्याचे विश्वास पाठक यांनी सांगितले.
लॉकडाऊनकाळात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी 12 जून, 2 जुलै, 6 जुलै रोजी मुंबई – नागपूर, 9 जुलै रोजी औरंगाबाद, मुंबई, नागपूर, दिल्ली असा विमान प्रवास केल्याचे माहिती अधिकारातून मागविलेल्या माहितीत ‘महानिर्मिती’ने विश्वास पाठक यांना दिली आहे. हा खर्च ऊर्जा खात्याच्या अखत्यारीतील चारही कंपन्यांनी बेकायदा पद्धतीने करावा लागला. मुख्यमंत्र्यांच्या अनुमतीशिवाय कोणालाही अशा पद्धतीने खासगी विमानाने सरकारी खर्चाने प्रवास करता येत नाही. त्यामुळे सरकारी तिजोरीतून बेकायदा पद्धतीने खर्च केल्याबद्दल भारतीय दंडविधान कलम 406, 409 अन्वये राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावी, अशी मागणी करणारा अर्ज आपण वांद्रे येथील निर्मलनगर पोलीस ठाण्यात 16 मार्च रोजी दाखल केला होता. या तक्रारीची अद्याप दखल घेतली न गेल्याने आपण मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली होती, अशी माहिती विश्वास पाठक यांनी दिली. ऊर्जामंत्री राऊत यांनी बेकायदा पद्धतीने वीज कंपन्यांच्या खर्चाने खासगी कामासाठी दिल्ली, नागपूर, औरंगाबाद, हैदराबाद, मुंबई येथे केलेल्या विमान प्रवासाची माहिती केंद्रीय कंपनी मंत्रालयाच्या अखत्यारीतील मुंबई रजिस्ट्रार कार्यालयाने राज्यातील चारही वीज कंपन्यांकडून मागविली असल्याचे विश्वास पाठक म्हणाले.