नागपुरात कलिंगडाच्या बियांनी इमारतीला पडलेल्या भेगा बुजविण्याचे तंत्रज्ञान विकसित

नागपूर : १७ जुलै – उन्हाळ्याच्या दिवसात सर्वांना प्रफुल्लित करणारे फळ म्हणजे कलिंगड, परंतु इतकाच याचा फायदा नाही. नागपूरच्या व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्यांनी कलिंगडाच्या बियांचा उपयोग करून जीर्ण इमारतीला पडलेल्या भेगा कायमस्वरूपी बुजविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. पावसाळा आला की जुन्या इमारती धोकादायक बनतात. सततच्या पावसामुळे भेगाळलेल्या किंवा जीर्ण झालेल्या इमारती कोसळण्याचा धोका असतो. त्यामुळे जुन्या इमारतीत राहत असाल आणि पाऊस व हवामानाच्या सततच्या माऱ्यामुळे इमारतीत पडलेल्या भेगा आणि छिद्रामुळे भयग्रस्त आहात तर कलिंगड वापरा. असं नागपूरच्या व्हीएनआयटीच्या सिव्हिल इंजीनियरिंग विभागाने आगळं वेगळं संशोधन केलं आहे.
टरबूज म्हणजेच कलिंगडाच्या बियांमधील “युरिएस” नावाचा एन्जाईम बांधकामाच्या मजबुतीकरणासाठी कमालीचा हातभार लावतो, असे या संशोधनातून समोर आले आहे. संशोधकांचा दावा आहे की कलिंगडाच्या बियांची पावडर, कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि युरियाचं एका विशिष्ट प्रमाणात मिश्रण करून पेस्ट बनवून ती पेस्ट बांधकामातील, इमारतीतील भेगांमध्ये किंवा छिद्रांमध्ये इंजेक्ट केल्यावर २८ दिवसानंतर ती भेग किंवा छिद्र कायमस्वरूपी बुजतात. तसेच ते पुढे रुंदावत नाहीत आणि बांधकामाला भविष्यात होणारे नुकसान थांबते.
कलिंगडाच्या बिया वापरून तयार केली जाणारी पेस्ट भेगा आणि छिद्र कायमस्वरूपी बुजवते हे प्रयोगशाळेतील सर्व चाचण्यांमध्ये १०० टक्के सिद्ध झाले असून संशोधकांना त्यासंदर्भात पेटंटही मिळाले आहे. आता लवकरच संशोधक या पेस्टचा वापर प्रत्यक्ष बांधकामात करून “फिल्ड व्हॅलिडेशन स्टडी” करणार आहेत.
विशेष म्हणजे भविष्यात ही पेस्ट स्वस्त आणि पूर्णपणे पर्यावरण पूरक असून भेगा व छिद्र बुजवण्यासाठी सध्या कंत्राटदारांकडून वापरल्या जाणाऱ्या केमिकलयुक्त महागड्या आणि पर्यावरण विरोधी “प्री मिक्सर” ला सशक्त पर्याय बनणार आहे.

Leave a Reply