डॉन अरुण गवळी होणार पदवीधर, कारागृहातून केला अभ्यासक्रम पूर्ण

नागपूर : १७ जुलै – मारामारी, अपहरण, खून या सारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये अडकलेला मुंबईचा अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यावर्षी इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून पदवीधर होणार आहे. आपली सत्ता आणि वर्चस्व कायम ठेवण्यासाठी गुंडगिरीमध्ये पदव्युत्तर राहिलेल्या अरुण गवळीलाही आता शिक्षणाचे महत्त्व उमगले आहे. त्यामुळे त्याने नागपूर मध्यवर्ती कारागृहात राहून पदवीपर्यंतचा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. पाच पैकी तीन विषयात अरुण गवळी उत्तीर्ण झाले असून दोन विषयात ते नापास झाले आहेत. त्यामुळे या दोन विषयांची परीक्षा पास केल्यानंतर ते ग्रॅज्युएट होतील, अशी माहिती इग्नुचे संचालक डॉ. पी. स्वरूप यांनी दिली आहे.
शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या खून प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. सुरुवातीला काही काळ मुंबईच्या कारागृहात राहिल्यानंतर अरुण गवळीची रवानगी नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली होती. 2015 पासून नागपूर येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. या काळात गवळीने शिक्षण घेण्यात रस दाखवल्याने इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात त्याला प्रवेश देण्यात आला होता. अरुण गवळीने प्रथम आणि द्वितीय वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर तृतीय वर्षाची परीक्षाही दिली होती. ज्याचा निकाल जाहीर झाला आहे. अरुण गवळीला पाच पैकी तीन विषयात यश मिळाले असून दोन विषयात अपयश आले आहे. अरुण गवळी येत्या काळात नापास झालेल्या दोन्ही विषयांची परीक्षा देऊन पदवीधर होतील, अशी माहिती इग्नुचे संचालक डॉ. पी. स्वरूप यांनी दिली आहे.
अरुण गवळी यांनी बीए चा अभ्यास पूर्ण करण्याकरिता इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला होता त्यामध्ये त्यांनी द स्टडी ऑफ सोसायटी, सोसायटी इन इंडिया, फाउंडेशन कोर्स इन ह्युमॅनिटी अँड सोशल सायन्स, फाउंडेशन कोर्स इन हिंदी आणि मराठी यासारख्या विषयांची निवड केली होती.

Leave a Reply