जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिकात्मक फाशी

वर्धा :१७ जुलै-प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी प्रशासनाकडे वारंवार निवेदन देऊनही कारवाई होत नसल्याने प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विकास दांडगे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाबाहेर नेमप्लेटला दोर लावून प्रतिकात्मक गळफास घेऊन आंदोलन करण्यात आले.
ठाणे येथील एस. कुमार कंस्ट्रक्शन या कंपनीने पुनर्वसीत नवरगाव येथील मडावी यांच्या शेतात उत्खनन केले. करारानुसार शेतात पडलेले खड्डे बुजविणे अपेक्षित होते. परंतु, २ वर्षांपासून कंपनीने सहकार्य केले नाही. तसेच, सेलू तालुक्यातील नवरगाव पुनर्वसितमधील लाभार्थ्यांना ६ वर्षापासून लाभ मिळालेला नाही. तत्कालीन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी उपविभागीय समिती नेमुन पुन्हा एकदा लाभार्थ्यांची फेरचौकशी करून त्याची यादी सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतरही विषय मागे पडला. या प्रकरणी पुन्हा निवेदन देण्यात आली, मात्र लाभार्थ्यांची यादी अद्याप तयार झाली नसल्याने गळफास आंदोलन करण्यात आले. प्रलंबित प्रश्न मार्गी लावले नाही, तर प्रत्यक्ष गळफास घेऊ, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.

Leave a Reply